चीनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून करोनाचीना लसीची वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने मुंबईमधील महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर धाव घेत आहेत. मात्र मुंबई महानगरपालिकेकडे केवळ कोव्हॅक्सिन लसीचा साठा उपलब्ध आहे. कोव्हीशील्ड लस घेण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना लस न घेताच माघारी फिरावे लागत आहे. परिणामी, अनेक जण खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन लस घेत आहेत. तर काहीजण कोव्हीशील्ड लसीच्या प्रतीक्षेत आहेत.
हेही वाचा >>> चीनमध्ये सापडलेल्या विषाणुमुळे घाबरण्याची गरज नाही; वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला
करोना लसीकरणाला १५ जानेवारी २०२१ पासून सुरूवात झाली. मात्र यावेळी सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेली कोविशिल्ड लस देण्यात येत होती. त्यामुळे मोठ्या संख्येने नागरिकांनी कोविशिल्ड लशीच्या दोन मात्रा घेतल्या आहेत. मात्र करोना आटोक्यात आल्याने अनेक नागरिकांनी वर्धक लशीची मात्रा घेण्याकडे दुर्लक्ष केले. चीनमध्ये सापडलेला ‘बीएफ ७’ हा नवा विषाणू वेगाने पसरत आहे. चीनसह अमेरिका, जापान आदी देशांमध्ये करोनाचा हा विषाणू वेगाने पसरत आहे. त्यामुळे भारतामध्ये सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. परिणामी, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
करोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून नागरिक मोठ्या प्रमाणात लसीची वर्धक मात्रा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रांवर गर्दी करीत आहेत. परंतु मुंबई महानगरपालिकेकडे केवळ कोव्हॅक्सिन लशींचा साठा उपलब्ध आहे. कोविशिल्डचा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांचा वर्धक मात्रा न घेताच परतावे लागत. परिणामी, अनेक जण खासगी रुग्णालयामध्ये जाऊन लशीची वर्धक मात्रा घेण्यास प्राधान्य देत आहेत. तर अनेक रुग्ण महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्रावर कोविशिल्ड लस कधी उपलब्ध होणार याची वाट पाहत आहेत.
हेही वाचा >>> करोनाचं संकट पुन्हा घोंगावतंय! प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आहारात करा ‘या’ पदार्थांचा समावेश
नागरिकांनी पाठ फिरवल्याने लस वाया
लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर करोनाचा धोका कायम असल्याने वर्धक मात्रा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. लसीच्या दोन मात्रा घेऊन आठ महिने झालेल्या नागरिकांना वर्धक मात्रा देण्यात येत होती. मात्र करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनेकांनी वर्धक मात्रा घेण्याकडे दुर्लक्ष केले. त्यावेळी महानगरपालिकेकडे वर्धक लसीसाठी आवश्यक साठा उपलब्ध हाेता. मात्र वर्धक मात्रा घेण्यासाठी नागरिकच न आल्याने महानगरपालिकेकडे उपलब्ध असलेली लस मोठ्या प्रमाणात वाया गेल्याचे मुंबई महापालिकेतील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.