लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई: राज्य शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेने स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून मानखुर्दमधील तब्बल दीड ते दोन हजार नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. अनेक वर्ष उलटल्यानंतरही या नागरिकांना अद्यापही हक्काचे घर मिळालेले नाही. त्यामुळे सरकारने तत्काळ याप्रकरणात लक्ष घालून संबंधितांना घर उपलब्ध करावे या मागणीसाठी गुरुवारी चेंबूरच्या समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता.
मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरात १२ वर्षांपूर्वी राज्य शसनाने गरिबांसाठी काही इमारती बांधल्या. गरीबांना परवडतील आशा किमतीत ही घरे उपलब्ध करण्यात आली असून महात्मा ज्योतिबा फुले सहकारी गृहनिर्माण संस्थेला या घरांची जबाबदारी देण्यात आली होती. इमारतीमध्ये कमी किमतीत घर मिळण्याच्या आशेपोटी अनेकांनी आपली झोपडी विकून, तर काहींनी व्याजाने पैसे घेऊन ते या संस्थेला दिले. मात्र संस्थेमधील काही माफियांनी तत्काळ घर मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून लाखो रुपये उकळून त्यांची फसवणूक केली.
हेही वाचा… मनीषा कायंदेंविरोधात ठाकरे गटाची अपात्रतेची याचिका?
दहा ते बारा वर्षे उलटल्यानंतरही या नागरिकांना हक्काचे घर मिळालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी मंत्रालय आणि म्हाडा कार्यालयावर मोर्चा काढला होता. मात्र सरकारकडून त्यांना आद्यपही दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे या नागरिकांनी गुरुवारी चेंबूरच्या समाजकल्याण कार्यालयावर मोर्चा काढला होता.