मुंबई : मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी साचणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाबाबत केलेल्या तक्रारींचे निराकरण व्हावे, कचऱ्याबाबत नागरिकांना तक्रार अथवा सूचना नोंदवता यावी यासाठी मुंबई महानगरपालिकेने ८१६९६८१६९७ हा व्हॉट्सॲप चॅटबॉट क्रमांक उपलब्ध केला आहे. या क्रमांकाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या घनकचराविषयक तक्रारींचे निराकरण करण्यात येणार आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जूनपासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मुंबईत घन कचरा व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी नागरिकांना थेट संपर्क सेवा उपलब्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार, मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या मार्गदर्शनाने, उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) चंदा जाधव यांच्या सूचनेनुसार घनकचरा व्यवस्थापन खात्याने ही नवीन व्हॉट्सॲप चॅटबॉट सुविधा नागरिकांना उपलब्ध केली आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून २०२३ पासून ही सेवा कार्यान्वित होणार आहे.
हेही वाचा – डॉ. लहानेविरोधातील ‘मार्ड’च्या संपाला अन्य संघटनांचा पाठींबा
या क्रमांकावर नागरिकांना कचरा न उचलणे, रस्ता स्वच्छ नसणे व मृत जनावरे उचलणे आदींबाबतच्या तक्रारी थेट छायाचित्रासह करता येणार आहेत. नागरिकांनी तक्रारीसोबत छायाचित्र, त्या ठिकाणाचा पत्ता / जीपीएस लोकेशन पाठवणे आवश्यक आहे. ही तक्रार ८१६९६८१६९७ या व्हॉट्सॲप चॅटबॉटवर नोंदणीकृत झाल्यानंतर, ती संबंधित विभागाकडे थेट जाणार आहे. सध्या तक्रार निर्मुलनाकरीता लागणारा वेळ या सुविधेमुळे कमी होणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित घनकचरा व्यवस्थापन अधिकारी या तक्रारीचे निश्चित केलेल्या वेळेत निर्मुलन करून त्या ठिकाणचे छायाचित्र अपलोड करतील. परिणामी नागरिकांना तक्रारीचे निर्मुलन केल्याचे समजणार आहे.