मुंबई: राज्यातील पक्ष फोडाफोडीच्या राजकारणावरून लोकांमध्ये धुमसत असलेल्या संतापाला वाट करून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरू केलेल्या ‘एक सही संतापाची’ आंदोलनाला राज्यभरातील नागरिकांकडून शनिवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मनसेने उभारलेल्या फलकावर सह्या करून नागरिकांनी आपला संताप व्यक्त करीत राजकारण्यांचा निषेध केला. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. लोकांनी विश्वासाने निवडून दिलेले आमदार रातोरात पक्ष बदलू लागले आहेत. त्यामुळे विश्वास तरी कोणावर ठेवायचा अशी स्थिती मतदारांची झाली आहे.
मनसेच्या या आगळयावेगळय़ा आंदोलनास लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुंबई दादर, छत्रपती शिवाजी टर्मिनस,ऐरोली, वाशी रेल्वे स्थानकात मोठे फलक उभारण्यात आले होते. दादरमध्ये मनसेचे नेते अमित ठाकरे, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई आदींच्या नेतृत्वाखाली या स्वाक्षरी मोहिमेला सुरुवात झाली. या ठिकाणी राज ठाकरे यांची राज्यातील राजकारणावरील भाषणे एलईडी स्क्रीनवर दाखवण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पक्षाचे उपाध्यक्ष अरविंद गावडे, वैभव शिदे, श्रीकांत गोरीवले आदींच्या नेतृत्वाखाली सह्यांची मोहीम राबविण्यात आली. ‘एक सही संतापाची’ ही मनसेची नाही तर लोकांची मोहीम असून लोकांना त्यांचा राग व्यक्त करण्याची संधी मनसेने उपलब्ध करून दिल्याचे संदीप देशपांडे यांनी सांगितले.