मुंबई: जानेवारी २०२५ च्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात हिवताप, डेंग्यू व चिकुनगुन्याचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. राज्यात हिवतापाचे ४०१, डेंग्यूचे २१० तर चिकुनगुन्याच्या १३० रुग्ण आढळले आहेत.

सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात जानेवारीच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये हिवतापाचे ४०१ रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये सर्वाधिक १८५ रुग्ण सापडले असून, त्याखालोखाल गडचिरोलीमध्ये १३८, रायगडमध्ये २६ आणि पनवेलमध्ये २२ रुग्ण सापडले आहेत. त्याचप्रमाणे डेंग्यूचे २१० रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मुंबईमध्ये ४४, अकोला ४१, नाशिक ३०, मालेगाव १६, सिंधुदुर्ग ११ रुग्ण सापडले आहेत. तसेच राज्यात गेल्या १५ दिवसांत चिकुनगुन्याचे १३० रुग्ण सापडले आहेत. गतवर्षी याच कालावधीत चिकुनगुन्याचे ७७ रुग्ण सापडले होते. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जानेवारीत चिकुनगुन्याच्या रुग्णांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. चिकुनगुन्याचे सर्वाधिक रुग्ण हे अकोल्यात सापडले असून तेथील रुग्णसंख्या ३५ आहे तर मुंबईत १९ रुग्ण सापडले आहेत. तसेच साताऱ्यात १७ रुग्ण सापडले आहेत.

हेही वाचा >>>Saif Ali Khan : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीला १४ दिवसांची पोलीस कोठडी द्या अशी मागणी पोलीस का करत आहेत? यामागची दहा महत्त्वाची कारणं काय?

हिवताप, डेंग्यू व चिकुनगुन्याच्या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून रुग्ण सापडलेल्या परिसरात सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येते. रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर लक्षणांनुसार उपचार सुरू करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे राज्यात हिवतापाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ८९ सेंटीनल केंद्रे तर डेंग्यू, चिकुनगुन्यासाठी ५० सेंटीनल केंद्रे सुरू करण्यात आल्याचे सार्वजनिक आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

हिवताप व डेंग्यूचे रुग्ण हे साधारणपणे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात आढळत असत. मात्र मागील काही वर्षांपासून मुंबईमध्ये सतत या आजाराचे रुग्ण सापडत आहेत. मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहेत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी साचणाऱ्या पाण्याचा योग्य प्रकारे निचरा न झाल्याने तेथे डासांची वाढ होते. त्यामुळे मुंबईमध्ये हिवताप व डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याची माहिती सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनायक सावर्डेकर यांनी दिली.

मागील काही वर्षांपासून वातावरणात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बदलांमुळे निसर्गाचे ऋतुचक्र बदलत आहे. या बदलत्या ऋतुचक्राबरोबरच मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प यामुळे हिवताप, डेंग्यू यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे शीव आयुर्वेद रुग्णालयातील डॉ. दिलीप लोखंडे यांनी सांगितले.

Story img Loader