मुंबई : गेल्या महिनाभरापासून अंधेरी येथील सहार गावात पाणीटंचाई निर्माण झाली असून आठवडाभरापासून पाणीपुरवठाच झाला नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर, संतप्त नागरिकांनी मंगळवारी पालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच, संबंधित परिसरातील जल जोडण्यांची तपासणी करण्याची मागणी त्यांनी पालिका प्रशासनाकडे केली. अवैध नळ जोडण्यांमुळे पुरेसे पाणी मिळत नसल्याचा आरोप मोर्च्यात सहभागी नागरिकांनी केला आहे.
गेल्या अनेक आठवड्यांपासून सहार गावातील जय दुर्गा नगरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अपुऱ्या आणि गढुळ पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले असून त्यांना आसपासच्या परिसरातून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा विकतचे पाणी घेऊन नागरिक तहान भागवत आहेत. या समस्येबाबत अनेकदा महापालिकेकडे तक्रार केली आहे. मात्र, पालिकेकडून प्रतिसाद मिळत नसल्याची खंत नागरिक करीत आहेत. गेल्या आठवडाभरापासून संबंधित परिसरात पाणीपुरवठाच झालेला नाही. त्यामुळे नागरिकांची दैनंदिन कामे ठप्प झाली आहेत. यामुळे नोकरदार वर्गाचे प्रचंड हाल होत आहेत. विकतचे पाणी आता खिशाला परवडत नसल्यामुळे या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी या परिसरातील नागरिकांना मंगळवारी के पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढला होता. तसेच, पालिकेच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. अवैध नळजोडण्यांमुळे नागरिकांना पाणी अपुरे पडत आहे. याबाबत महापालिकेला पूर्ण कल्पना असूनही त्यांच्याविरोधात कारवाई होत नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अवैध नळ जोडण्यांची तपासणी करावी, अवैध जोडणी करून देणाऱ्या प्लम्बरविरोधात कडक कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही अनेक भागांमध्ये अपुरा पाणीपुरवठा होत आहे. अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असून झोपडपट्टी परिसरात ही समस्या आणखी तीव्र झाली आहे. झोपडपट्टी परिसरात एका नळाद्वारे पाच ते सहा घरांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांमध्ये पाण्यावरून वादही होत आहेत. प्रशासकडून याबाबत अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. गेल्या अनेक महिन्यांपासून पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या दिंडोशीमधील नागरिकांनी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात संबंधित पालिका कार्यालयावर मोर्चा काढला होता.