ठाणे महापालिकेच्या एका नव्या नियमामुळे शहरात उभ्या राहणाऱ्या नव्या गृहसंकुलांमध्ये ठोकळेबाज घरांची संकल्पना मोडीत निघून घरमालकास त्याच्या मनाप्रमाणे घराची रचना करण्याची संधी मिळणार आहे. घर विकत घेताना ग्राहकाला घरातील शयनगृह, हॉल, मुलांसाठी अभ्यासाची खोली नेमकी कुठे आणि किती आकाराची असावी, हे ठरविण्याचा अधिकार मिळू शकेल, अशा प्रकारची सुधारणा विकास नियंत्रण नियमावलीत करण्याची तयारी महापालिकेच्या शहर विकास विभागाने केली आहे.
वास्तुविशारद आणि विकासकाच्या संकल्पनेतून साकारलेल्या इमारतीत जवळपास प्रत्येक घराची रचना ही ठरलेली असते. घरातील किचन आणि प्रसाधनगृहाची जागा मंजूर नकाशाप्रमाणेच असावी, मात्र घरांच्या उर्वरित आराखडय़ात केवळ भिंतीच्या रचनेनुसार मंजुरी देण्याची तरतूद केली जात आहे. त्यामुळे वायुविजन आणि प्रकाशासंबंधी आखून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत मालकास त्याच्या घराची रचना करण्याची मुभा मिळू शकणार आहे.
शहर विकास विभागाकडे वास्तुविशारदांमार्फत इमारतीचा आराखडा सादर केल्यानंतर साधारणपणे ठराविक रचनेच्या घरांना मंजुरी देण्यात येते. त्यानुसार इमारती उभ्या राहतात, मात्र घरांचा ताबा मिळाल्यानंतर रहिवासी आपल्या सोयीनुसार रचनेत बदल करण्याचा प्रयत्न करतात. बेडरूम, हॉल यांसारख्या भागाचा आकार मोठा करण्याच्या प्रयत्न स्वयंपाकाची खोली, बाथरूमची रचना बदलली जाते आणि त्याचा परिणाम संपूर्ण इमारतीच्या रचनेवर होऊ लागतो.
घरातील या अंतर्गत बदलांमुळे इतर घरांमध्ये गळती लागल्याच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर पुढे येऊ लागल्या आहेत. हे लक्षात घेऊन ठाणे महापालिकेने आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला असून यानुसार ठोकळेबाज घरांऐवजी किचन, न्हाणीगृहासह चार िभतींची रचना असलेल्या घरांच्या आराखडय़ास मंजुरी देण्याचा प्रस्ताव आखण्यात आला आहे.
वायुविजन, प्रकाश महत्त्वाचा
एखादी इमारत उभारताना प्रत्येक मजल्यावरील घरांची रचना साधारणपणे सारखी ठेवली जाते. हे करताना नॅशनल बिल्डिंग कोडच्या निकषांची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे. हे जरी खरे असले तरी यामुळे ग्राहकांना आपल्या मनाप्रमाणे घराची रचना करता येत नाही. एखाद्या घरात प्रत्येक खोलीचे आकारमान किती असावे याविषयीचे काही निकष ठरलेले असतात. मात्र, खोलीची रचना कशी असावी हे ठरविण्याचे अधिकार घरमालकास मिळावेत, अशी एक कल्पना पुढे येऊ लागली आहे.
चार भिंतींच्या आराखडय़ास मंजुरी दिल्यास झोपण्याची खोली, अभ्यासाची खोली, हॉल नेमका कुठे असावा आणि त्याची रचना कशी असावी हे घरमालकास ठरविता येऊ शकणार आहे.
यासंबंधीच्या प्रस्तावास सर्वसाधारण सभेची मान्यता घेतल्यानंतर तो शासनाच्या मंजुरीसाठी पाठविला जाईल, अशी माहिती शहर विभाग विभागाचे प्रमुख जितेंद्र भोपळे यांनी दिली.
इमारतीमधील प्रत्येक घराची मलवाहिनी साधारणपणे एकाच मार्गाने असावी, असा निकष आहे. तो काटेकोरपणे पाळला जावा हा महापालिकेचा प्रमुख उद्देश असून घरांचा ताबा दिल्यानंतर इतर खोल्यांची रचना बदलण्याच्या नादात सांडपाणी वाहून नेणाऱ्या मार्गिका बदलल्या जाऊ नयेत, यासाठी ही सुधारणा केली जात आहे.
-असीम गुप्ता,ठाणे महापालिका आयुक्त

Story img Loader