मुंबई: म्हाडाच्या वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात अर्थात म्हाडा भवनात दररोज शेकडोंच्या संख्येने नागरिक विविध कामांसाठी निवेदने, पत्र, तक्रारी वा इतर कागदपत्रे घेऊन येतात. अशावेळी त्यांना संबंधित विभागीय मंडळाच्या कार्यालयात जाऊन आपले पत्र, निवेदन वा कागदपत्रे जमा करावी लागतात. पण आता मात्र भवनाची पायरी न चढता भवनाच्या आवारातच एकाच ठिकाणी कोणत्याही विभागाची कागदपत्रे देता येणार आहेत. कारण आता म्हाडा भवनात नागरी सुविधा केंद्र बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार या कामासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. येत्या दीड-दोन महिन्यात हे नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित करण्याचे म्हाडाच्या मुंबई मंडळाचे नियोजन आहे. हे केंद्र कार्यान्वित झाल्यास एकाच ठिकाणी म्हाडा प्राधिकरणासह सर्व विभागीय मंडळांच्या कागदपत्रांची स्वीकृती केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांसाठी हा मोठा दिलासा ठरणार आहे.

म्हाडा भवनात दररोज पाच हजारांहून अधिक नागरिक विविध कामांसाठी येतात. म्हाडा प्राधिकरण, मुंबई मंडळ, कोकण मंडळ, झोपु मंडळ, दुरूस्ती मंडळाशी संबंधित पत्रे, निवेदन, तक्रारी किंवा इतर काहीही कागदपत्रे जमा करावी लागतात. अशावेळी हे प्रत्येक मंडळ वेगवेगळ्या मजल्यांवर असल्याने वा कोणत्या मजल्यावर कोणत्या मंडळाचे कार्यालय आहे ते अनेक नागरिकांना माहित नसते. अशावेळी नागरिकांना म्हाडा भवनात फेऱ्या माराव्या लागतात. तसेच आपल्या निवेदनाचे, पत्राचे, तक्रारीचे पुढे काय झाले यासंबंधी माहिती घेण्यासाठीही म्हाडा भवनात येऊन पाठपुरावा करावा लागतो. पण आता मात्र नागरिकांची ही गैरसोय लवकरच दूर होणार आहे. कारण सर्व कागदपत्रांच्या स्वीकृतीचे एकत्रिकरण करून नागरिकांना चांगली सुविधा निर्माण करुन देण्यासाठी म्हाडाने मुंबई मंडळाच्या माध्यमातून नागरी सुविधा केंद्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हाडा भवनाच्या आवारात मोकळ्या जागेत हे नागरी सुविधा केंद्र बांधण्यात येणार आहे. २ कोटी ३६ लाख ७८७ रुपये खर्चाच्या या नागरी सुविधा केंद्राच्या बांधकामासाठी कंत्राटदाराची नियुक्ती करण्यासाठी मंडळाने नुकतीच निविदा प्रसिद्ध केली आहे.

हेही वाचा >>>८० वर्षे जुने हनुमान मंदिर हटविण्यासाठी मध्य रेल्वेची नोटीस

मंडळाच्या निविदेनुसार १९ डिसेंबरपर्यंत निविदांची स्वीकृती होणार असून २० डिसेंबरला निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. लवकरात लवकर ही निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकामाला सुरुवात करण्याचे मंडळाचे नियोजन असल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. निविदेनुसार बांधकामाचा कालावधी एका महिन्याचा आहे. त्यामुळे या कालावधीसह निविदा प्रक्रिया पूर्ण करून बांधकाम पूर्ण होण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावाधी लागण्याची शक्यता आहे. नव्या वर्षात हे नागरी सुविधा केंद्र कार्यान्वित होणार असून हे केंद्र विकसित झाल्यास म्हाडाच्या आवारातील या केंद्रात जाऊन कोणतीही कागदपत्रे जमा करणे नागरिकांना सोपे होणार आहे. तर आपल्या निवेदनाचे, पत्राचे वा तक्रारीचे पुढे काय झाले याचीही माहिती या नागरी सुविधा केंद्राद्वारे जाणून घेता येणार आहे.

Story img Loader