अभिनेता आमीर खान याच्या नग्न छायाचित्रामुळे वादात सापडलेल्या ‘पीके’ चित्रपटावर देशभरात बंदी घालावी, या मागणीसाठी मुंबईतील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेमध्ये सेन्सॉर बोर्डाचे पदाधिकारी, चित्रपटाचे निर्माते विधू विनोद चोप्रा, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि आमीर खान यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी ही याचिका दाखल केली असून, आमीर खान याच्या नग्न छायाचित्रांचे प्रदर्शन थांबविण्याची त्याचबरोबर चित्रपटातील अश्लील दृश्ये काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. जोपर्यंत अश्लील दृश्ये काढत नाही, तोपर्यंत चित्रपटाचे देशभरातील प्रदर्शन रोखून धरण्याची मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वापरण्यात येत असलेल्या आमीर खान याच्या नग्न छायाचित्रामुळे अश्लील भावना निर्माण होत आहेत. त्याचबरोबर प्रेक्षकांची मनेही दूषित होत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे.

Story img Loader