देवनार कचराभूमी परिसरातील नागरिकांच्या भावना; काँग्रेस उपाध्यक्षांच्या आगमनापूर्वी सर्व रस्ते चकाचक
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी देवनार कचराभूमीची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून पोलिसांसकट सर्वच यंत्रणांची धावपळ उडाली होती. कधी नव्हे ते कचराभूमीतील रस्ता पाणी मारून ठाकठीक केला होता. कचराभूमीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर कागदाचा कपटाही शोधून सापडत नव्हता. दरुगधीचा मागमूस लागू नये म्हणून कीटकनाशक पावडरही पसरविण्यात आली होती. ही सर्व तयारी पाहून देवनारकर भारावून गेले. ‘राहुल गांधी तुम्ही नेहमी इथे या, मग अशीच स्वच्छता राखली जाईल आणि आपसूकच आरोग्याचा प्रश्नही मार्गी लागेल’, अशी भावना कचराभूमीलगतच्या झोपडपट्टीतील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली.
दूषित पाणी, अस्वच्छता, दरुगधी, सतत कचरा भरून येणाऱ्या वाहनांची वर्दळ, उडणाऱ्या धुळीचा त्रास अशा अनेक समस्यांचा समाना देवनार कचराभूमीलगतच्या कमला रामन नगर, बैंगनवाडी, शिवाजी नगर आदी वस्त्यांमधील झोपडपट्टीवासीयांना करावा लागत आहे. अस्वच्छता, दरुगधी, विषारी वायू आणि कचऱ्याला लागणाऱ्या आगीनंतर बाहेर पडणाऱ्या धुरामुळे या परिसरात प्रचंड प्रदूषण वाढत आहे. क्षमता संपुष्टात आली असली तरी देवनार कचराभूमीत आजही दररोज सुमारे तीन हजार मे. टन कचरा टाकला जात आहे. एकंदर परिस्थितीमुळे या परिसरातील रहिवासी अस्थमा, क्षयरोग आदी विविध आजारांनी त्रस्त आहेत.
देवनार कचराभूमीत आग लागल्यानंतर अनेक नेते येथे येऊन गेले. रहिवाशांना भेटले. अनेक आश्वासने दिली. पण त्यांची आश्वासने हवेत विरली. देवनार कचराभूमी बंद होण्याची चिन्हे आजही दिसत नाहीत. राहुल गांधी यांनी मंगळवारी देवनार कचराभूमीची काही मिनिटेच पाहणी केली. कचराभूमीतून बाहेर पडणारा धूर त्यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर उभे राहून पाहिला. हे दृश्य वृत्तपत्र छायाचित्रकारांनी, वाहिन्यांच्या कॅमेरामननी टिपल्यानंतर थोडय़ाच वेळात राहुल गांधी पुढच्या कार्यक्रमासाठी मार्गस्थ झाले. राहुल यांचा हा दौरा काही मिनिटांचा. पण ते येणार म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कित्येक तासांपासून तयारी चालवली होती. देवनार कचराभूमीच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नेहमी कचऱ्याच्या गाडय़ांची गर्दी असते. गाडीतील कचरा रस्त्यावर सांडलेला असतो. त्यामुळे पसरणाऱ्या दरुगधीमुळे नरकयातना सहन कराव्या लागतात, अशा वेदना कचराभूमीला खेटून असलेल्या कमला रामन नगरमधील इकबाल जहाँ यांनी व्यक्त केली.
या परिसरात मंगळवारी मात्र वेगळेच वातावरण होते. पालिकेने केवळ कचराभूमीच्या बाहेरील रस्ताच नव्हे, तर आतील रस्ताही लख्ख केला होता. बाहेरच्या रस्त्यावरचा कचराच नव्हे, तर धूळही झाडून सारा परिसर स्वच्छ केला होता.
रस्त्याच्या दुतर्फा कीटकनाशक पावडर टाकण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यावर दरुगधीचा मागमूसही नाही. कचराभूमीत काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर सकाळपासून टँकरचे पाणी मारण्यात येत होते. त्यामुळे रस्ता चालण्यायोग्य झाला होता.
अशीच काळजी नेहमी घेतली तर इथल्या रहिवाशांचे आरोग्य धोक्यात येणार नाही. पण पालिका अशी काळजीच घेत नाही. त्यामुळे राजीव गांधी यांनी दररोज देवनार कचराभूमीला भेट द्यावी, मग किमान इथली स्वच्छता आणि रहिवाशांच्या आरोग्याचा मार्गी लागेल, असे मत याच वस्तीमधील हुसेन खान यांनी व्यक्त केले.

Story img Loader