मुंबई : भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे होत असताना संविधानाला अपेक्षित असलेले विचारी नागरिक घडवण्याचे आणखी एक पाऊल म्हणून ‘लोकसत्ता लेक्चर’ या उपक्रमाला आज, शनिवारपासून प्रारंभ होत आहे. या ‘विचारोत्सवा’ची नांदी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या व्याख्यानाने होत असून ‘संघराज्याच्या क्षमतांचे आकलन’! (अंडरस्टॅण्डिंग फेडरलिझम अॅण्ड इट्स पोटेन्शियल) या विषयावर ते आपले विचार मांडणार आहेत.
हेही वाचा >>> बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : आरोपीला लुधियानातून अटक
सर्वोच्च न्यायालयाला ‘संविधानाचे राखणदार’ म्हटले जाते, कारण संविधानाचा अर्थ लावणे आणि प्रसंगी बेबंद राजकारणापासून देशाला वाचवण्यासाठी संविधानाचा आसूडही (रिट) उगारणे हे सर्वोच्च न्यायालयाचे कर्तव्य. राज्यपालांना त्यांच्या अधिकारांप्रमाणेच मर्यादांचीही जाणीव देऊन, केंद्राने राज्यांवर लादलेले निर्णय रद्द करून तसेच कोणते कर आकारण्याचा अधिकार राज्यांनाच आहे हे वेळोवेळी सकारण स्पष्ट करून सर्वोच्च न्यायालयाने संविधानाला अपेक्षित असलेल्या केंद्र-राज्य संबंधातील समतोलाचेही रक्षण केलेले आहे. यापैकी काही निकाल उण्यापुऱ्या दोन वर्षांच्या कारकीर्दीत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनीही दिलेले आहेत. त्यामुळेच, संविधानाचा अमृतमहोत्सवी क्षण महिन्याभरावर (२६ नोव्हेंबर) आला असताना सरन्यायाधीश न्या. चंद्रचूड यांच्या व्याख्यानातून संघराज्य रचनेवर केले जाणारे भाष्य अतिशय महत्त्वपूर्ण विचारमंथन ठरणार आहे.