मुंबई : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात काहीही आलबेल नसून विधानसभेला निवडून कसे यायचे याची विद्यामान आमदारांना चिंता आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील निधी वाटपावर डोळा ठेवून बरेच आमदार तिकडे थांबलेले आहेत. एकदा निधी मिळाली की अजित पवार गटातील किमान १९ आमदार मूळ पक्षात परततील, असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. आगामी विधानसभा निवडणुकीत ‘मविआ’च्या जागावाटपात पक्षाला ८५ जागा हव्यात असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रदेश कार्यालयात सोमवारी पत्रकारांशी बोलताना रोहित पवार म्हणाले, अजित पवार यांचा पक्षात कुणावरही विश्वास नाही, त्यामुळे त्यांनी घरात आपल्या पत्नींना राज्यसभेची उमेदवारी दिली असावी. मोदी यांच्याबरोबरच्या बहुतांश बैठकांना प्रफुल्ल पटेल असतात. त्यामुळे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार आहेत की प्रफुल्ल पटेल आहेत, असा मला प्रश्न पडला आहे.पटेल यांची पक्षावर खूप पकड आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाला भविष्यात केंद्रात जे मंत्रिपद मिळणार आहे, ते मलाच मिळणार असे सांगितले असावे, असे पवार म्हणाले.

हेही वाचा >>>वायव्य मुंबईतील निकालाची जगभर चर्चा; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

अजित पवार आणि सुप्रिया सुळे लहानपणापासून एकत्र वाढले आहेत. त्यामुळे सुप्रिया या अजित पवार यांच्यासंदर्भात हळव्या होतात, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.आगामी पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचा भर शेतकरी कर्जमाफी, राज्याबाहेर गेलेले उद्याोग आणि राज्य सरकारचा भ्रष्ट कारभार यावर राहणार आहे. आपल्यात आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात कुठलेही मतभेद नाहीत, असा त्यांनी खुलासा केला.लोकसभेला ‘मविआ’ मध्ये सर्वात कमी राष्ट्रवादीने घेतल्या होत्या. त्यामुळे आगामी विधानसभेला ‘मविआ’ने राष्ट्रवादीला अधिक जागा दिल्या पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली. विधानसभेला आम्हाला किमान ८५ जागा हव्या आहेत, अशी भूमिका पवार यांनी यावेळी मांडली.