लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारे, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी यंदा मुंबई महापालिका २३५ कोटी रुपये खर्च करणार आहे. पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणे अपेक्षित असताना आतापर्यंत ३० टक्के गाळ काढण्यात आला आहे. यंदा निविदा प्रक्रियेतील आरोपांमुळे नालेसफाईच्या कामांना उशीर झाल्यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही शहराचे तुंबलेले रुप मुंबईकरांना पाहावे लागणार आहे.

मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबू नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी व नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे केली जातात. संपूर्ण वर्षभरातील नालेसफाईपैकी ८० टक्के गाळ हा पावसाळ्यापूर्वी काढला जातो. दहा टक्के गाळ पावसाळ्यादरम्यान आणि १० टक्के पावसाळ्यानंतर काढला जाणार आहे. ही कामे दरवर्षी मार्च महिन्यात सुरू होतात. मात्र यंदा नालेसफाईच्या निविदा प्रक्रियेवर विरोधकांनी टीका केली होती. तसेच एका कंत्राटदाराने न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे निविदा प्रक्रिया रखडली होती. मात्र मार्च अखेरीस आणि एप्रिल नंतर ही कामे सुरू झाली आहेत. आतापर्यंत पावसाळ्याच्या आधीच्या कामापैकी ३० टक्के गाळ काढण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.

शहर भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी गुरुवारी केली. गगराणी यांनी मुंबई शहर भागातील वरळी येथील रेसकोर्स नाला, नेहरू विज्ञान केंद्र नाला व दादर धारावी नाला या ठिकाणांना भेट दिली. तसेच, नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. यावेळी पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी गगराणी यांनी निर्देश दिले की, छोट्या व मोठ्या नाल्यांचे सुयोग्य नियोजन करुन खोलीकरण करावे, नाल्यांमधून उपसलेल्या गाळाची ४८ तासांत निर्दिष्ट स्थळावर विल्हेवाट लावावी. आवश्यक त्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’ चा वापर करावा. पावसाळ्यात नाल्यांचा प्रवाह वाहता राहील, याची दक्षता घ्यावी, असेही निर्देश महानगरपालिका आयुक्तांनी पर्जन्य जलवाहिन्या विभागाला दिले आहेत.

यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आयुक्त म्हणाले, मुंबई महानगराची निचरा प्रणाली (ड्रेनेज सिस्टीम) ही नाल्यांवर आधारित आहे. प्रत्येक वर्षी पावासाळ्यापूर्वी नाल्यांची स्वच्छता, गाळ काढणे आदी कामे करावी लागतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेने नाल्यातून गाळ काढण्याची कामे हाती घेतली आहेत. पावसाळापूर्व उद्दिष्टापैकी आजमितीला सुमारे ३० टक्के काम झाले आहे. पावसाळा सुरू व्हायला अद्याप सव्वा महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार गाळ उपशाचे कामकाज सुरू आहे. उर्वरित सव्वा महिन्यांच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील, असे त्यांनी नमूद केले.

नाल्यात कचरा टाकू नये ….

मुंबईकर नागरिकांना आवाहन करताना गगराणी म्हणाले की, नागरिकांनी नाल्यात घनकचरा विशेषत: प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, थर्मोकॉल आदी तरंगता कचरा टाकू नये. त्या घनकचऱ्यामुळे सांडपाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होऊ शकतो. नाल्याच्या दुतर्फा तसेच आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी स्वत:च्या आणि मुंबईकरांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून, तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता गृहित धरता प्लास्टिक / तरंगता कचरा हा कचराकुंडीतच टाकावा. दाट लोकवस्तीच्या ठिकाणी किंवा अन्य नागरी वसाहतींच्या ठिकाणी महानगरपालिकेने कचरा संकलनाची व्यवस्था केली आहे. नागरिकांनी ठरवून दिलेल्या त्या ठिकाणीच कचरा टाकला आणि नाल्यात टाकला नाही, तर महानगरपालिकेला मदत होईल, असे देखील महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी आवाहन केले.