लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते, असे वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी विविध ठिकाणी नोंदवण्यात आलेले सात गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही त्यांच्या या मागणीची सोमवारी दखल घेऊन राज्य सरकारला नोटीस बजावली व आव्हाड यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.
जाणूनबुजून वक्तव्य करून विशिष्ट वर्गाच्या धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यासह अन्य ठिकाणी एकूण सात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे, हे सर्व गुन्हे ठाणे येथील वर्तक नगर किंवा नवघर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात यावेत, अशी मागणी आव्हाड यांनी याचिकेद्वारे केली आहे. न्यायमूर्ती रेवती डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठासमोर आव्हाड यांनी केलेल्या याचिकेवर सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी, न्यायालयाने सरकारला नोटीस बजावून आव्हाड यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले व प्रकरणाची सुनावणी दोन आठवड्यांनी ठेवली.
आणखी वाचा-पदवी अभ्यासक्रमांसाठीच्या नोंदणीसाठी उद्या शेवटचा दिवस
जानेवारीत अयोध्या येथे राम मूर्तीचा अभिषेक सोहळा होणार होता. त्यावेळी, भाजप आमदार राम कदम यांनी २२ जानेवारी रोजी राम मूर्ती अभिषेक सोहळ्याच्या दिवशी राज्यात मद्य आणि मांसबंदी करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना आव्हाड यांनी प्रभू राम हे आमच्यासारख्या बहुजनांचे होते. ते शिकार करून खाणारे होते. ते शाकाहारी नव्हते, असे वक्तव्य केले होते. चौदा वर्षे जंगलात राहणाऱ्या व्यक्तीला शाकाहारी जेवण कुठे मिळेल ? असा प्रश्नही आव्हाड यांनी या भाषणात केला होता.
त्यांच्या या वक्तव्यानंतर प्रचंड गदारोळ झाला. तेव्हा आव्हाड यांनी आपण संशोधनावर आधारित भाषण केले होते, असा दावा केला होता. तसेच, आपल्या वक्तव्यामुळे कोणाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर माफी मागायची तयारी दाखवली होती. त्यानुसार, त्यांनी माफीही मागितली होती. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यामुळे आव्हाड यांच्यावर विविध गुन्हे दाखल करण्यात आले.