‘क्लार्क हाऊस’बद्दल अलीकडेच कला-समीक्षक आणि संशोधक नूपुर देसाई यांनी ‘रंगधानी’ या सदरात (लोकसत्ता शनिवारचे संपादकीय पान : ८ जुलै) लिहिलं होतं. क्लार्क हाऊस हा चित्र-शिल्पकारांचा समूह आहे, आदी माहिती त्यातून मिळत होती. पण ‘क्लार्क हाऊस’ नावाचीच ब्रिटिशकालीन इमारत रीगल सिनेमाच्या चौकात, ‘सहकारी भांडार रेस्टॉरंट’च्या समोर आहे आणि तिथंच या समूहाची जागा आहे. इथल्या तीन दालनांत अगदी निवडक प्रदर्शनं भरतात. सध्या इथं पाराशर नाईक यांनी विचारनियोजित केलेलं ‘नार्सिसिझम अॅण्ड सोशल इंटरअॅक्शन’ (स्वत:त रममाण होणं आणि सामाजिक अभिक्रिया) या नावाचं प्रदर्शन भरलं आहे. समूहातल्या दृश्य कलावंतांना तसंच ज्या तरुणांची निवड झाली त्यांना हा विषय दोन महिने आधीच दिला गेला होता. पण कलावंत म्हणून आपापले प्राधान्यक्रम कायम ठेवून कलाकृती घडल्यामुळे, इथं वैविध्य आहे. उदाहरणार्थ अमोल पाटीलनं गोरेपणा देणाऱ्या क्रीमच्या जाहिराती आणि पॅकिंग या सर्वावर स्व-प्रतिमा डकवली आहे. व्हिडीओ-जाहिरातीतही अमोलचाच डकवलेला चेहरा (फोटोशॉप) दिसत राहातो. मैथिली बावकर हिनं अॅसिडहल्लाग्रस्त मोनालिसाचं चित्रण केलं आहे आणि तिनंच चेहरा ‘सुंदर’ करण्यासाठीच्या शस्त्रक्रियांत वापरल्या जाणाऱ्या आयुधांचे फोटोही प्रदर्शनात मांडले आहेत. प्रभाकर कांबळे यानं स्वप्रतिमा अधिक मोठी करण्याचा खटाटोप यांत्रिक खेळवजा क्रियेद्वारे दाखवला आहे. आणखी एका चित्रकर्तीनं ती आणि तिचा मित्र यांच्यातल्या संवादात मित्र कसा पुरुषी अहंकाराचे ‘गरुडपंख’ फडफडवून दाखवतो हे चित्रमालिकेतून टिपलं आहे. सुधीर राजभर यानं ‘मित्रों’ असं लिहिलेली एक वीट इथं ठेवली आहे. या विटेकडे पाहताना कोणाला डिसेंबर-१९९२ च्या आधी संघ परिवारानं जमवलेल्या (आणि पुढे काहीच न झालेल्या) विटांची आठवण कोणाला येईलही, पण ही इथली वीट म्हणजे अखेर ‘कलाकृती’च आहे! तंबाखू खाणं, टीव्ही पाहत पाहत जेवणं या क्रियांमध्ये गुंतणारी माणसं स्वत:त किती रममाण असू शकतात आणि त्यामुळे काय काय होत राहतं याचं दर्शन घडवणारी छोटेखानी फिल्म आणि ‘काश्मीर डू इट युअरसेल्फ’ ही खेळवजा कलाकृती पाराशर नाईक यांची आहे. सत्य बोलल्याबद्दल थपडा खाणारा माणूस योगेश बर्वे यांनी व्हिडीओतून जिवंत केला आहे आणि सत्य म्हणजे काय काय याचीही एक कल्पना प्रेक्षकाला दिली आहे. ही रूढार्थानं ‘आर्ट गॅलरी’ नाही. प्रदर्शन समविचारी मंडळींनी पाहावं, कलाविषयक चर्चाच अधिक वैचारिक
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा