रिफायनरी प्रकल्पावरून बारसूमधील वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. स्थानिक ग्रामस्थांकडून या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. या प्रकल्पाविरोधात आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आज त्यांनी सर्वेक्षणाच्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचंही पाहायला मिळालं.
बारसूतील या झटापटीबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही प्रतिक्रिया दिली. “बारसूमध्ये तणाव निर्माण झाला आहे. मात्र, ही परिस्थिती निर्माण करण्यामागे नेमकं कोण आहे, याचा शोध घेतला पाहिजे. कालपर्यंत येथील प्रकल्पगस्त सरकारशी चर्चा करण्यासाठी तयार होते. आजही त्यांच्याशी सकारात्मक चर्चा सुरू होती. पण आज बाहेरची माणसं आणून ही परिस्थिती चिघळवण्यात आली”, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
हेही वाचा – Barsu Refinery Protest : ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना अटक
पुढे बोलताना, “सकाळी खासदार विनायक राऊत सुद्ध मोर्च्या काढण्याच्या तयारीत होते. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन आता ग्रामस्थांनी मोर्चा काढला”, असेही ते म्हणाले. तसेच “ बारसूतील ग्रामस्थांनी कोणत्याही पक्षीय राजकारणाला बळी पडू नये. त्यांच्या ज्या शंका असतील त्या दूर करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आमच्याशी चर्चा करावी”, असे आव्हानही त्यांनी केले.