मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गत मुंबई महानगरक्षेत्रातील अकरावी प्रवेशाची दुसरी विशेष प्रवेश यादी मंगळवार, १३ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आली. सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांची संबंधित शाखांसाठीची दुसरी विशेष प्रवेश यादी जाहीर झालेली नाही. या यादीअंतर्गत विविध महाविद्यालयांतील १ लाख ३४ हजार ९१२ जागांसाठी ३५ हजार २८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी २७ हजार ६३९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय देण्यात आले. तर दुसऱ्या विशेष फेरीत अर्ज केलेल्या ७ हजार ३८९ विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळण्याची प्रतीक्षा आहे. तसेच १८ हजार ७०३ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे, ३ हजार ६४५ विद्यार्थ्यांना दुसऱ्या पसंतीचे आणि १ हजार ८७७ विद्यार्थ्यांना तिसऱ्या पसंतीचे महाविद्यालय देण्यात आले आहे.

पहिल्या तीन नियमित प्रवेश फेऱ्यांच्या तुलनेत नामांकित महाविद्यालयांतील प्रवेश पात्रता गुण (कट ऑफ) नव्वदीपारच गेले होते. मात्र, पहिल्या विशेष प्रवेश फेरीनंतर दुसऱ्या विशेष फेरीतही नामांकित महाविद्यालयातील प्रवेश पात्रता गुणांत मोठी घट झाली आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ४ ते ५ टक्क्यांची घट झाली आहे. दुसऱ्या विशेष प्रवेश यादीअंतर्गत चर्चगेट येथील एच. आर. महाविद्यालयात वाणिज्य शाखेसाठी ९५.८ टक्के, के. सी. महाविद्यालयात कला शाखेसाठी ८०.६ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.६ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ६३.३३ टक्के, जय हिंद महाविद्यालयात कला शाखेसाठी ८२.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८७.४ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७२.०० टक्के, फोर्ट येथील सेंट झेविअर्स महाविद्यालयात कला शाखेसाठी ८५.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८६.२ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८३.०० टक्के, माटुंग्यातील रुईया महाविद्यालयांत कला शाखेसाठी ६६.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७९.०० टक्के, रुपारेल महाविद्यालयांत कला शाखेसाठी ८०.०० टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८५.८ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८८.०० टक्के, विलेपार्ले येथील साठ्ये महाविद्यालयांत कला शाखेसाठी ६९.४ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८५.४ टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ८३.८ टक्के, मिठीबाई महाविद्यालयात कला शाखेसाठी ८३.६ टक्के, वाणिज्य शाखेसाठी ८९.०० टक्के आणि विज्ञान शाखेसाठी ७७.४ टक्के, एन. एम. महाविद्यालयांत वाणिज्य शाखेसाठी ८८.६ टक्के प्रवेश पात्रता गुण असतील.

हेही वाचा – मुंबई : २० वर्षे रखडलेली बसेरा झोपु योजना अखेर मार्गी!

दरम्यान, दुसऱ्या विशेष प्रवेश फेरीनुसार केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, संस्थात्मक, अल्पसंख्यांक, व्यवस्थापन कोटाअंतर्गत आणि द्विलक्षी अभ्यासक्रमासाठी महाविद्यालय मिळालेल्या विद्यार्थ्यांना १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येईल. विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयांत प्रवेश निश्चित करायचा असल्यास स्वतःच्या लॉगिनमधील ‘अपलोड रिक्वॉयर्ड डॉक्युमेंट्स’ या पर्यायावर क्लिक करून कागदपत्रे अपलोड करावीत आणि ‘प्रोसिड फॉर ॲडमिशन’ या पर्यायावर क्लिक करून संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करावा.

हेही वाचा – Mumbai Stunt : मुंबईतील रस्त्यांवर हुल्लडबाज तरुणांचे माकडचाळे; बसस्टॉप, बाईकवरून जीवघेणा स्टंट करणाऱ्यांना पोलिसांनी घडवली अद्दल!

शाखानिहाय उपलब्ध जागा आणि निवड झालेले विद्यार्थी

शाखा – उपलब्ध जागा – निवड झालेले विद्यार्थी

कला – २३ हजार १२४ – १ हजार ७८२

वाणिज्य – ७० हजार ७५६ – १६ हजार १८६

विज्ञान – ३८ हजार ७२६ – ९ हजार ४१५

व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम – २ हजार ३०६ – २५६

एकूण – १ लाख ३४ हजार ९१२ – २७ हजार ६३९