उमेदवारांच्या माहितीला व्हायरसची बाधा झाल्याचे निमित्त करीत ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’ची ७ एप्रिलची ‘राज्य सेवा पूर्व’ परीक्षा पुढे ढकलण्यामागे काही ठराविक कोचिंग क्लासचालकांचे षडयंत्र असल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. परीक्षांर्थीच्या संगणकात जमा असलेल्या माहितीला व्हायरसची बाधा झाल्यानंतरही नियोजित वेळापत्रकानुसार सक्षमपणे परीक्षा घेता येऊ शकेल, असा विश्वास एमपीएससीला होता. ‘वास्ट इंडिया’ या आयटी कंपनीकडे असलेला ‘डाटा’ जरी ‘करप्ट’ झाला असला तरी परीक्षार्थीनी बँकेद्वारे भरलेल्या परीक्षा शुल्काच्या माध्यमातून जमा झालेल्या माहितीच्या आधारे परीक्षा घेण्याची तयारी एमपीएससीने केली होती. केवळ उमेदवारांना परीक्षा केंद्र ठरवून देण्याबाबत अडचणी असल्याने आयोगाने परीक्षार्थीकडून त्याचे नाव आणि परीक्षा केंद्राविषयी जुजबी माहिती संकेतस्थळावर भरून मागवली. पण आयोगाचे संकेतस्थळच दिवसभर ‘जॅम’ राहिल्याने अडचणी निर्माण झाल्या.
नेमक्या याच मुद्दय़ावरून पुण्यातून वेगवेगळ्या माध्यमातून आयोगावर परीक्षा पुढे ढकलण्याबाबत दबाव येऊ लागला. विधिमंडळ अधिवेशनातच तशी मागणी झाल्याने आयोगाने १८ मेपर्यंत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. पण, काही ठराविक ‘आयपी अॅड्रेस’वरून दिवसभर जाणीवपूर्वक ‘लॉगइन’ करून ठेवण्यात आल्यानेच आयोगाचे संकेतस्थळ जॅम राहिले, अशी धक्कादायक माहिती आयोगाने केलेल्या चौकशीत पुढे आली आहे.  या संदर्भात आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या सर्व प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे, अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करत प्रतिक्रिया देणे टाळले.