मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या सदस्यांची बैठक येत्या ३१ मे रोजी पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.समितीने तयार केलेला हा अहवाल मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सादर करण्याचा समितीचा प्रयत्न होता. मात्र आता पुण्यातील बैठकीस उपस्थित राहणाऱ्या शासकीय प्रतिनिधींकडे हा अहवाल सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती समितीच्या सूत्रांकडून देण्यात आली.
राज्य शासनाने स्थापन केलेल्या समितीला ३१ मे २०१३ पर्यंत किंवा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळेपर्यंत ही समिती कार्यरत राहणार आहे. अलिकडेच मल्याळम भाषेला केंद्र शासनाकडून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. कोणत्याही भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे, ही दीर्घकाळ चालणारी प्रक्रिया आहे. समितीने तयार केलेला हा अहवाल शासकीय अधिकाऱ्यांना सादर केल्यानंतर त्यांच्याकडून तो मुख्यमंत्र्याना सादर केला जाईल. त्यानंतर हा अहवाल आणि त्यासाठीचा प्रस्ताव राज्य शासनाकडून केंद्र शासनाला सादर करण्यात येईल.