मुंबई : प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांचे बुधवारी रात्री त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी गुरुवारी सकाळी त्यांच्या शिवाजी पार्क येथील घरी ठेवण्यात येणार आहे. दादर येथील शिवाजी पार्क स्मशानभूमीत सायंकाळी ५ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि सुना-नातवंडे असा परिवार आहे.
उत्कृष्ट शास्त्रीय संगीत गायक, शास्त्रीय संगीताबरोबरच फ्युजन संगीतातही वैशिष्ठ्यपूर्ण काम, उत्कृष्ट शिक्षक अशी बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित प्रभाकर कारेकर गेली दोन वर्ष यकृताच्या आजाराने ग्रस्त होते. अखेर बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. १९४४ मध्ये गोव्यात म्हापसा येथील दैवज्ञ कुटुंबात पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म झाला. संगीताचा पिढीजात वारसा कारेकर यांना लाभला नव्हता, मात्र त्यांचे वडील जनार्दन कारेकर यांना संगीताची आवड होती. दर गुरवारी त्यांच्या घरी भजनाचा कार्यक्रम होत असे, ज्यात प्रभाकर कारेकरही सहभागी होत असत. एकदा शाळेच्या स्नेहसंमेलनासाठी त्यांनी पं. सुरेश हळदणकर यांनी गायलेली दोन नाट्यपदे मोठ्या तयारीने गायली. त्यांचे गाणे ऐकून गावातील काही परिचितांनी प्रभाकर यांच्या वडिलांना त्यांना गाणे शिकवण्यासाठी मुंबईत पाठवण्याची सूचना केली. त्यावेळी गोव्यात पोर्तुगीज राजवट होती. महत् प्रयासाने प्रभाकर यांचे वडील त्यांना मुंबईत घेऊन आले आणि पं. सुरेश हळदणकर यांची भेट घेऊन मुलाला गाणे शिकवण्याची विनंती केली. प्रभाकर यांचा आवाज ऐकून पं. हळदकणर यांनी त्यांना आपल्या घरीच येऊन राहण्यास सांगितले. पुढची दहा वर्ष प्रभाकर कारेकर यांनी पं. हळदणकर यांच्याकडे राहून संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे ९ वर्ष आणि पुढे पंडित सी. आर. व्यास यांच्याकडूनही त्यांनी शास्त्रीय गायनाचे धडे घेतले. तीन वेगवेगळ्या शैलीत गाणाऱ्या गुरूंकडून संगीताचे शिक्षण घेत, त्याला स्वत:च्या संगीत अभ्यास आणि रियाजाची जोड देत गायक म्हणून स्वत:ची वेगळी शैली विकसित केली.
त्यांची ‘बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल’, ‘करिता विचार सापडले वर्म’, ‘वक्रतुंड महाकाय…’, ‘हा नाद सोड’, ‘नभ मेघांनी आक्रमिले’ यांसारखी अनेक गाणी लोकप्रिय आहेत. त्यांनी ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनसाठीही अनेक संगीताचे कार्यक्रम केले. ऑर्नेट कोलेमन (अमेरिका) आणि सुलतान खान यांच्याबरोबर त्यांनी केलेला फ्युजन अल्बमही लोकप्रिय ठरला.
तानसेन सन्मान (२०१४), संगीत नाटक अकादमी (२०१६), लता मंगेशकर पुरस्कार, गोमान्त विभूषण पुरस्कार (२०२१) आदी प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना नावाजण्यात आले होते. संगीत क्षेत्राशी संबंधित कार्यशाळा घेणे, देशोदेशी होणाऱ्या संगीत विषयक परिषद-कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्याबरोबरच अनेक होतकरू विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताचे शिक्षण दिले. शास्त्रीय संगीत हाच ध्यास आणि श्वास घेऊन जगलेल्या अग्रणी कलाकारांमध्ये पंडित प्रभाकर कारेकर यांचे नाव आवर्जून घेतले जाते.