हायड्रोलिक वाहनतळाच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना अचानक त्याखाली सापडून एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी चेंबूर परिसरात घडली. याप्रकरणी चेंबूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अपुऱ्या जागेत जास्त वाहने उभी करता यावी यासाठी सध्या अनेक इमारतींमध्ये हाइड्रोलिक वाहनतळाची सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> ‘मेट्रो २ ब’मधील मंडाले कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण

चेंबूरच्या रस्ता क्रमांक १५ येथील ‘स्वस्तिक फ्लेअर’ या इमारतीमध्ये ही सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. येथील हाइड्रोलिक वाहनतळाचा काही भाग सोमवारी नादुरुस्त झाला होता. काही कर्मचारी त्याची दुरुस्ती करण्यासाठी आले होते. कर्मचारी कामात व्यस्त असताना या इमारतीमध्ये साफसफाईचे काम करणारा योगेश जाधव (४०) दुरुस्तीचे काम पाहात तेथे उभा होता. मात्र याच वेळी अचानक दोन मोटरगाड्यांसह हाइड्रोलिक वाहनतळ खाली कोसळले. त्याखाली सापडलेला जाधव गंभीर जखमी झाला. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने जाधवला कोसळलेल्या वाहनतळाखालून बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील डॉक्टरांनी जाहीर केले. चेंबूर पोलिसांनी याप्रकरणी दुरुस्तीचे काम करणाऱ्या कंपनीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.