मुंबई : देशभरात महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वच्छता दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने स्वच्छता पंधरवडा अभियान हाती घेतले आहे. हे अभियान १६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान राबविण्यात येणार असून या कालावधीत मध्य रेल्वेवरील स्थानके, रेल्वे कार्यालये, वसाहती, कारखाने, देखभाल डेपो, रुग्णालये यांची स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच या पंधरवड्यात स्वच्छतेविषयी जनजागृतीही करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेवरील काही महत्त्वाच्या स्थानकांवरील फलाट स्वच्छ झाले आहेत. मात्र काही फलाटांची स्थिती अत्यंत दयनीय आहे. रेल्वे परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. या ठिकाणाची सफाई करण्याचे लक्ष्य मध्य रेल्वेने ठेवले आहे. स्वच्छतेसोबतच प्रवाशांना स्थानकात चांगल्या दर्जाचे खाद्यपदार्थ, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवानी यांनी शुक्रवारी मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. मध्य रेल्वेचे मुख्यालय आणि सर्व विभागातील रेल्वे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेसाठी वर्षातून १०० तास म्हणजे आठवड्यातून दोन तास समर्पित करावे, स्वच्छतेसाठी स्वेच्छेने काम करावे, एकदा वापरून फेकण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या वस्तूंविरोधात जनजागृती करावी, स्वच्छतेसाठी आपली बांधिलकी दाखवून स्वत: कुटुंब, परिसर आणि कामाच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी वचनबद्ध होत असल्याची प्रतिज्ञा अधिकार, कर्मचाऱ्यांनी घेतली.
प्लास्टिक बंदीबाबत जनजागृती करण्यासाठी विविध कार्यालये, युनिट्स आणि डेपोमध्ये श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून स्वयंसेवी संस्था आणि सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण व स्वच्छता प्रकल्पाबाबत विविध नाविन्यपूर्ण कामे सुरू करण्यात आली. स्वच्छता पंधरवड्यादरम्यान स्पर्धा आणि जनजागृती रॅलीही काढण्यात येणार असून ‘प्लास्टिकला नाही म्हणा’ हा संदेश देण्यात येईल. २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी स्वच्छता पंधरवड्याची सांगता होईल, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.