या वेळच्या लोकसभा निवडणुकीत एक गोष्ट चांगली झाली आहे. मागच्या निवडणुकीत घोटाळा झाला होता. राज्यातील निवडणुका एकाच दिवशी होत्या. त्यामुळे सर्व मंडळी गावाकडे गेली. या वेळी साताऱ्यात १७ तारखेला, तर मुंबईत २४ तारखेला मतदान आहे. त्यामुळे तेथेही घडय़ाळावर शिक्का हाणायचा आणि इथेही शिक्का हाणायला यायचे, पण येताना पहिली शाई पुसून टाकायची, नाही तर घोटाळा होईल, असे धक्कादायक वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष व जुनेजाणते, अनुभवी नेते शरद पवार यांनी वाशी येथील एका कार्यक्रमात केल्याने ते आचारसंहितेच्या कात्रीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
माथाडी कामगारांचे दिवंगत नेते अण्णासाहेब पाटील यांचा स्मृतिदिन महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल युनियनच्या वतीने रविवारी तुर्भे येथील कांदा बटाटा लिलावगृहात कामगार मेळाव्यात बोलताना पवार यांनी ही बेलगाम विधाने केली. सुरुवातीला आपल्या भाषणात आचारसंहितेचे महत्त्व सांगणाऱ्या पवार यांनी मतदारांना दोनदा मतदान करण्याचा सल्ला दिला.
नवी मुंबईत सातारा सांगलीतील माथाडी कामगार मोठय़ा प्रमाणात राहतात. या कामगारांना आपल्या गावी व येथे नवी मुंबईत मतदानाचा हक्क बजावण्याचा सल्ला पवार यांनी अप्रत्यक्षपणे दिला. त्यामुळे त्यांनी आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्ट झाले आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला असताना गुजरातमधील काही बांधवांनी येथील गुराढोरांना पशुखाद्य पाठविले. हे पशुखाद्य पाठविणाऱ्या अधिकाऱ्यांवर खटले भरण्यात आले. हे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्यावरून झाले होते, असा आरोप पवार यांनी केला. या संकुचित विचारांना आवर घालण्याची आवश्यकता असल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्याला हे वर्ष खराब गेले असून वर्षांची सुरुवात दुष्काळाने झाली, तर आता गारपिटांनी शेतकऱ्यांना फटका बसला आहे. माथाडय़ांसाठी घरे, मराठय़ांना आरक्षण देण्यास सरकार अनुकूल आहे. मुंबईमधील मराठी माणसाची अस्मिता जपली जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. या वेळी गणेश नाईक व शशिकांत शिंदे यांचीदेखील भाषणे झाली.  
बाजारात तुरी..
मी एवढय़ा निवडणुका पाहिल्या, पण कोणत्याही निवडणुकीत पंतप्रधान पदाचा उमेदवार जाहीर करण्यात आला नव्हता. ज्या पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून येतात. त्यांची बैठक झाल्यानंतर पंतप्रधानाचा उमेदवार निवडला जातो. इथे कशाचाही पत्ता नसताना पंतप्रधानाचा उमेदवार ठरवला गेला आहे, असा टोला त्यांनी भाजप नेते नरेंद्र मोदी यांच्यावर लगावला.
मोदींवर टीका
मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात महात्मा गांधी यांनी इंग्रजांना ‘चले जाव’ नारा दिला. मोदी हा नारा वर्धामधून दिल्याचे सांगतात. ज्या नेत्याला या देशाचा इतिहास, भूगोल माहीत नाही त्यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत, अशी टीका पवार यांनी मोदी यांच्यावर केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा