मुंबई : करोना रुग्णसंख्या घटत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आल्याच्या पाश्र्वभूमीवर सहकारी संस्थांच्या दोन वर्षांपासून रखडलेल्या पंचवार्षिक निवडणुकांची रणधुमाळी पुन्हा सुरू होत आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँकांसह सुमारे ६५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकांवरील बंदी उठविण्याच्या हालचाली सहकार विभागात सुरू असून, पहिल्या टप्यात १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, साखर कारखाने, सूतगिरण्या, बाजार समित्या, दूध संघ, शिखर संस्था अशा ‘अ’ वर्गातील ११६ मोठय़ा सहकारी संस्था, सहकारी नागरी बँका, क्रेडीट सोसायटी, कर्मचाऱ्यांच्या क्रे डीट सोसायटी अशा ‘ब ’ वर्गातील मध्यम स्वरूपाच्या १३ हजार ८५, छोटय़ा क्रे डीट सोसायटी, गृहनिर्माण संस्था, छोटे दूध संघ अशा ‘क’ वर्गातील १३ हजार ७४ आणि ग्राहक संस्था, कामगार संस्था अशा ‘ड’ वर्गातील २१ हजार संस्था अशा ४५ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका दोन वर्षांपासून रखडलेल्या आहेत. यंदा २० हजार संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.

करोनाची दुसरी लाट ओसरत असून बहतांश जिल्ह्य़ातील निर्बंधही शिथिल करण्यात आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निवडणुकांना मुभा देण्यात आली आहे.

उर्वरित संस्थांच्या निवडणुकांना ३१ ऑगस्टपर्यंत स्थगिती असली तरी तीही उठविण्याबाबत चर्चा सुरू आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून याही निवडणुकांची रणधुमाळी सुरू होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. ज्या १५ जिल्हा मध्यवर्ती बँकाच्या निवडणुकांना परवानगी देण्यात आली आहे, त्यातील काही बँकांची निवडणूक प्रक्रिया मतदानाच्या टप्यावर आली,  काही बँकांमध्ये ठराव घेणे, मतदार याद्या तयार करण्याच्या टप्यावर प्रक्रिया आहेत. ज्या टप्प्यावर स्थगिती होती, तेथूनच पुढची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार विभागाने दिले आहेत. त्यानुसार निवडणूक प्राधिकरण पुढील प्रक्रिया सुरू करेल.

या बँकांची निवडणूक

पुणे, लातूर, मुंबै, जळगाव, रत्नागिरी, धुळे-नंदूरबार, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सातारा, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुका होणार आहेत. अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, हसन मुश्रीफ, अमित देशमुख, छगन भुजबळ आणि प्रविण दरेकर यांची आपल्या जिल्ह्यतील बँके वरील वर्चस्व कायम ठेवताना कसोटी लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Clear the way for the election of 15 district banks including mumbai zws
Show comments