प्रसाद रावकर, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : घड्याळाच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईकरांना बंद घड्याळाचे काटे कधीही पाहवणार नाहीत. परंतु दक्षिण मुंबईमधील महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट) च्या दर्शनी भागातील ‘क्लॉक टॉवर’ची टिकटिक सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे वेळेची आठवण करून देणारा वर्षानुवर्षांचा साथीदार पुन्हा सोबतीला असावा, अशी मागणी मंडईतील व्यापारी, दुकानदार, विक्रेते आणि फेरीवाले करीत आहेत. देश-विदेशातून मुंबई दर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांचे फुले मंडई आकर्षणाचे केंद्र मानले जाते.

ब्रिटिश अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांची गरज लक्षात घेऊन १८६९ साली क्रॉफर्ड मार्केटची उभारणी करण्यात आली. पुरातन वारसा वास्तू असलेल्या या मंडईला त्यावेळचे नगर आयुक्त आर्थर क्रॉफर्ड यांचे नाव देण्यात आले. त्यामुळे ही मंडई क्रॉफर्ड मार्केट नावाने ओळखली जाऊ लागली. त्याचबरोबर या इमारतीवर दर्शनी भागात १८७१ मध्ये भव्य असे ‘क्लॉक टॉवर’ उभारण्यात आले. तेव्हापासूनच हे घड्याळ अनेकांचे आकर्षण बनले. आजही अनेक पर्यटक ते पाहण्यासाठी मंडई परिसरात येतात.

आणखी वाचा-संप दडपण्याचा प्रयत्न केल्यास रस्त्यावर उतणार, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा सरकारला इशारा

कालौघात क्रॉफर्ड मार्केटचे महात्मा ज्योतिबा फुल मंडई असे नामकरण करण्यात आले. महात्मा ज्योतिबा फुले मंडई पालिकेच्या अखत्यारित आली. तेव्हापासून महापालिका प्रशासन मंडईची देखभाल करीत आहे.

घड्याळ का बंद?

  • एकीकडे मंडईच्या नूतनीकरणाचे काम सुरू असताना ‘क्लॉक टॉवर’कडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे.
  • काही वर्षांपूर्वी या घड्याळाच्या देखभाल, दुरुस्तीसाठी तज्ज्ञ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कंत्राट कालावधी संपुष्टात आल्यामुळे देखभालीअभावी घड्याळाची टिकटिक बंद झाली आहे.
  • घड्याळ बंद पडल्याची बाब अनेकांनी महापालिकेच्या निदर्शनासही आणून दिली. मात्र अद्याप घड्याळाच्या दुरुस्तीसाठी मुहूर्त मिळू शकलेला नाही.
  • या घड्याळाच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेण्यात येईल, असे पालिकेच्या पुरातन वारसा वास्तू विभागातील अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

क्रॉफर्ड मार्केटच्या दर्शनी भागातील ‘क्लॉक टॉवर’ची टिकटिक गेले सहा महिने बंद आहे. त्यामुळे वेळेची आठवण करून देणारा वर्षानुवर्षांचा साथीदार पुन्हा सोबत असावा, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली.