महापालिकेचे पथक कारवाईविनाच परतले
ठाणेतील किसननगर भागातील हबीब मंजील या अतिधोकादायक इमारतीवर कारवाईसाठी बुधवारी महापालिकेचे पथक गेले होते. मात्र, स्थानिक रहिवासी तसेच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्या विरोधामुळे या पथकास इमारतीवर कारवाई करता आली नाही आणि पथक कारवाईविनाच परतले.
शीळ – डायघर येथील इमारत दुर्घटनेनंतर ठाणे महापालिका प्रशासनाने अतिधोकादायक व धोकादायक इमारतींविरोधात कारवाई सुरू केली आहे. मात्र रहिवाशांचे आधी पुनर्वसन करा, मगच इमारतीवर कारवाई करा, असा सूर लावत सर्वपक्षीय नेत्यांनी महापालिकेच्या कारवाईस विरोध सुरू केला आहे. अनधिकृत इमारतींवर कारवाई करू नये, यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी मध्यंतर ‘ठाणे बंद’ केले होते.
दरम्यान, पावसाळा तोंडावर आल्याने महापालिकेचे पथक हबीब मंजील या अतिधोकादायक इमारतीवर कारवाई करण्यासाठी गेले होते. त्या वेळी आधी स्थानिक रहिवाशांनी या कारवाईला विरोध केला. तसेच याबाबत माहिती मिळताच शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी आले व त्यांनीही कारवाईला विरोध केला. इमारतीमधील नागरिकांचे आधी पुनर्वसन करा, मग इमारतीवर कारवाई करा, असे त्यांनी पथकास सांगितले. तसेच या संदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असून याबाबत जोपर्यंत निर्णय होत नाही, तोपर्यंत कारवाई करू नये, असेही त्यांनी या वेळी पथकास सांगितले.
त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि आमदार शिंदे यांच्या विरोधापुढे नमते घेत महापालिकेच्या पथकाने इमारतीवर कारवाई केली नाही.

Story img Loader