मुंबई: बेस्ट बसच्या अपघातानंतर खबरदारी म्हणून बेस्ट प्रशासनाने कुर्ला पश्चिम येथील बस स्थानक सध्या पूर्णपणे बंद केले आहे. त्यामुळे मंगळवारी सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून प्रवाशांना पायपीट करत एलबीएस मार्ग गाठावे लागत आहे.
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री बेस्ट बसच्या अपघातानंतर परिसरात मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बेस्ट प्रशासनाने तत्काळ बस स्थानकातील असलेल्या सर्व बसगाड्या कुर्ला आगारात रवाना केल्या. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून कुर्ला पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बस स्थानकातून एकही बस सोडण्यात आली नाही. कुर्ला पश्चिम येथून वांद्रे-कुर्ला संकुल, अंधेरी, सांताक्रुज आणि दक्षिण मुंबई परिसरात अनेक बस सोडल्या जातात. मात्र मंगळवारी सकाळपासून एकही बस या स्थानकातून सोडण्यात आली नाही. परिणामी प्रवाशांना दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून कर्ला आगार गाठावे लागले.
हेही वाचा – वानवा.. स्वच्छतागृहांची
बस नसल्याने आणि रिक्षांच्या अपुऱ्या संख्येमुळे कुर्ला पश्चिम परिसरातील प्रवाशांचे हाल झाले. सर्वात मोठा मनस्ताप शालेय विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांना सहन करावा लागला. तर कामावर जाण्यास उशीर होत असल्याने नोकरदारही संतप्त झाले होते.
अपघातामुळे बेस्ट मार्गात बदल
कुर्ला येथील बुद्ध काॅलनी परिसरात सोमवारी रात्री अपघात झाल्याने पोलिसांनी कुर्ला स्थानक बंद केले. परिणामी, या बस स्थानकातून सोडण्यात येणारे बसमार्ग क्रमांक ३७, ३२०, ३१९, ३२५, ३३०, ३६५ आणि ४४६ च्या बसगाड्या कुर्ला आगारातून धावत आहेत. तसेच सांताक्रूझ स्थानक – कुर्ला स्थानक दरम्यान धावणारे बस मार्ग क्रमांक ३११, ३१३ आणि ३१८ या बसगाड्या टिळक नगर येथून वळण घेऊन कुर्ला स्थानकाकडे न जाता सांताक्रूझ स्थानकाकडे जात आहेत. बसमार्ग क्रमांक ३१० देखील टिळक नगर पूल येथून वळण घेऊन वांद्रे बस स्थानकाकडे जात आहेत.