Mumbai Maharashtra Weather Update Today: बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढील पाच दिवस राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी वारे, ढगांच्या गडगटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्याच्या बहुतांश भागांत गारपीट होण्याचा अंदाज आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून राज्याच्या दिशेने बाष्पयुक्त वारे येत आहेत. ओडिशापासून तमिळनाडूपर्यंत हवेची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ वातावरण निर्माण होणार आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा जोर जास्त राहणार आहे. राज्याच्या बहुतांश भागात ४० ते ६० किलोमीटर प्रती तास वेगाने वादळी वारे वाहून ढगांच्या गडगटासह अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मंगळवार आणि बुधवारी राज्यात पावसाचा आणि गारपिटीचा जोर जास्त राहील.
राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. बाष्पयुक्त वातावरण आणि तापमान वाढीमुळे जास्त उंचीचे ढग निर्माण होत आहेत. जास्त उंचीच्या ढगांमुळे विजांच्या कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
उन्हाळ्यात गारपीट का होते
उन्हाळ्यात जास्त उंचीचे ढग तयार होतात. उंचावर गेल्यामुळे ढगाभोवतीचे तापमान कमी कमी होत जाऊन शून्याहून कमी होते. त्यामुळे पाणी गोठते आणि पाण्याच्या कणाचे हिमकण तयार होतात. ते अत्यंत हलके असल्यामुळे खाली पडत नाहीत. पण, हवेतील अंतर्गत प्रवाहामुळे हिमकण प्रवाहीत होतात, त्यांची हालचाल होते. हिमकणांच्या हालचालीमुळे अन्य तरंगणारे कण एकमेकांना चिकटतात आणि हिमकणांचा आकार वाढतो. हिमकण मोठे होऊन, त्याचे लहान-मोठ्या गारांमध्ये रूपांतर होते. त्यामुळे गारांचे वजन वाढते. ढग त्यांचे वजन पेलू शकत नाहीत आणि त्या जमिनीवर येऊन पडतात.
© The Indian Express (P) Ltd