मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात गर्दी होऊ लागली आहे. मात्र दुपारपासूनच दादर व आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण झाले होते. त्यामुळे दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. दादरमध्ये संध्याकाळी पावसाच्या हलक्या सरींना सुरूवात झाली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज पार्कात चिखल झाला असून पावसाची पर्वा न करता कार्यकर्ते घोषणाबाजी करीत सभास्थळी येत आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई शहर, उपनगर आणि आसपासच्या परिसरात मुसळधार हजेरी लावली आहे. विशेषतः सायंकाळनंतर पावसाच्या सरींना सुरूवात होत आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यावर पावसाचे सावट असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू आहे. दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात ढगाळ वातावरण झाले असून पावसाच्या हलक्या सरी पडत आहेत. काही वेळातच दसरा मेळावा सुरू होत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यातून शिवसैनिक दसरा मेळाव्यासाठी दादर परिसरात दाखल होत आहेत. विविध घोषणा देत आणि वाजत – गाजत येणाऱ्या शिवसैनिकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा, ही ताकद कुणाची? शिवसेनेची, अरे कोण आला रे कोण आला? शिवसेनेचा वाघ आला, मुंबई आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची’, शिवसेना जिंदाबाद, अरे या गद्दारांचे करायचे काय? खाली डोके वर पाय आदी घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला आहे.