मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या वांद्रे पूर्व येथील गांधीनगर अभिन्यासातील रखडलेल्या १८ इमारतींचा पुनर्विकास आता लवकरच मार्गी लागणार आहे. या इमारतींचा पुनर्विकास समुह पुनर्विकासाच्या माध्यमातून होणार असून यासाठीचा प्रस्ताव नुकताच गांधीनगरमधील सोसायट्यांकडून मुंबई मंडळाला सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावानुसार अंदाजे ५०० रहिवाशांचे पुनर्वसन केले जाणार असून या पुनर्विकासाअंतर्गत मुंबई मंडळाला अधिमूल्यासह काही अतिरिक्त घरे मिळण्याचीही शक्यता आहे. म्हाडा उपाध्यक्षांची मान्यता मिळाल्यानंतर हा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश ग्रोथ हबअंतर्गत म्हाडाने २०३० पर्यंत आठ लाख घरांचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे उद्दिष्ट म्हाडा आपल्या गृहनिर्माण योजना, उपकरप्राप्त इमारतींसह म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासाच्या माध्यमातून पूर्ण करणार आहे. त्यानुसार उपकरप्राप्त इमारतींसह म्हाडा अभिन्यासातील इमारतींच्या पुनर्विकासाला आता वेग देण्यात येईल, असे म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी जाहीर केले. समूह पुनर्विकासाला प्राधान्य देण्याचा निर्णय जयस्वाल यांनी घेतला आहे. म्हाडा वसाहतींचा पुनर्विकासही समूह पुनर्विकासाअंतर्गत व्हावा यासाठी आता म्हाडाचे प्रयत्न असणार आहेत. समूह पुनर्विकासाअंतर्गत रहिवाशांना मोठी घरे मिळतात हा मुख्य फायदा आहेच, मात्र त्याचवेळी विविध प्रकारच्या सुविधा समूह पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध होतात. त्यामुळे सोसायट्यांनी समूह पुनर्विकासाला प्राधान्य द्यावे, अशी आग्रही भूमिका म्हाडाची आहे. आता म्हाडा मुख्यालायालगतच्या गांधीनगर अभिन्यासातील १८ इमारतींतील रहिवासी समूह पुनर्विकासासाठी पुढे आले आहेत. गांधीनगरमधील १८ इमारतींच्या समूह पुनर्विकासासाठी सोसायट्यांकडून काही दिवसांपूर्वीच मंडळाला सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. या १८ इमारतींमध्ये अंदाजे ५०० रहिवासी असून या रहिवाशांना आता अंदाजे ७०० चौरस फुटांचे घर मिळण्याची शक्यता असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सोसायट्यांच्या प्रस्तावानुसार समूह पुनर्विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी एका खासगी विकासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाकडे सादर झालेल्या प्रस्तावास आता जयस्वाल यांची मान्यता घेत चार चटई क्षेत्र निर्देशांकाच्या अनुषंगाने हा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात येणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर प्रकल्प प्रत्यक्षात मार्गी लागणार असून ५०० रहिवाशांच्या पुनर्वसनाचा, मोठ्या घरातील वास्तव्याचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला अधिमूल्यसह अतिरिक्त घरे मिळणार आहे. मात्र हे अधिमूल्य नेमके किती आणि अतिरिक्त घरांची संख्या किती हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.