मंत्रिपदाचा राजीनामा देण्यापूर्वी गमजा मारणारे काँग्रेस नेते नारायण राणे यांची तलवार दिल्लीत आल्यावर म्यान झाली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना हटवण्याची मागणी करणाऱ्या राणे यांना स्वत:च्या भवितव्यासाठी खुद्द चव्हाण यांच्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. राणे यांनी आज, गुरुवारी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेत स्वत:ची व्यथा मांडली. नाराजी दूर झाल्यास राजीनामा मागे घेणार असल्याचे राणे यांनी दिल्लीत स्पष्ट केले. आपल्या नाराजीवर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत, असे राणे म्हणाले. मुख्यमंत्री चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व राणे उद्या शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतील, असा दावा नारायण राणे यांनी केला. प्रत्यक्षात  हायकमांडकडून रात्री उशिरापर्यंत चव्हाण यांना दिल्लीवारीचा निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे राणे यांची गोची होण्याची शक्यता आहे.
    राहुल गांधी यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राणे म्हणाले की, मंत्रिपदाच्या राजीनाम्याची अनेक कारणे आहेत. त्याची माहिती राहुल गांधी यांना दिली आहे. राहुल सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांच्यासमवेत सोनिया यांची भेट घेतल्यानंतर मी अंतिम निर्णय घेईल. राणे यांना पक्षात मोठे पद हवे आहे. मुख्यमंत्रिपदासाठी ते अडून बसले होते; परंतु लोकसभा निवडणुकीत स्वत:च्या मुलाला निवडून आणू न शकणाऱ्या राणे यांना पक्षात फारसे महत्त्व उरलेले नाही. काही नेते फक्त एकाच पदाच्या लालसेपोटी पक्षात येतात, त्यांना कसे काय रोखता येईल, असा सूचक प्रश्न काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनू संघवी यांनी अलीकडेच उपस्थित केला होता. त्यामुळे राणे यांची मनधरणी करण्यात येणार नसल्याचे संकेत आहेत. राणे यांना स्वत:च्या दोन्ही मुलांसाठी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी हवी आहे. ही मागणी पूर्ण होऊ शकणार नसल्याचे मुख्यमंत्री चव्हाण यांनी राणे यांना सांगितल्याचा दावा सूत्रांनी केला. त्यामुळे राणे अस्वस्थ झाले आहेत. ही मागणी मान्य करण्यासाठी त्यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. महाराष्ट्रासह आसाममध्येही काँग्रेसमध्ये फूट पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे राणे यांच्यासंदर्भात निर्णय घेताना इतर राज्यांना चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी हायकमांड घेणार आहे, असे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Story img Loader