बहुचर्चित राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोमवारी सायंकाळी दिल्लीत जाऊन पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. भाजपाचे संघटन महामंत्री रामलाल यांच्यासोबत फडणवीस आणि दानवे यांनी दिल्लीतील लीला पॅलेस या हॉटेलमध्ये प्रदीर्घ चर्चा केल्याचे समजते. या बैठकीत शिवसेनेबरोबर जागावाटप, एकनाथ खडसेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, दानवे व फडणवीस हे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनाही भेटतील असे म्हटले जात होते पण ही भेट झाली नसल्याचे सांगितले जाते. या बैठकीसाठी कमालीची गुप्तता बाळगण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रदीर्घ काळापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. ठराविक कालावधीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा होत असते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि रावसाहेब दानवे हे मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर चर्चेसाठी दिल्लीत गेले होते. पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा मंत्रिमंडळात समावेश करुन त्यांचे पुनर्वसन करण्याबाबतही चर्चा झाल्याचे ‘एबीपी माझा’ने म्हटले आहे. महामंत्री रामपाल यांच्याबरोबर सुमारे ४ तास बैठक झाली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. पक्षाध्यक्ष अमित शाह सध्या निवडणूक प्रचार दौऱ्यावर आहेत. ते रात्री उशिरा दिल्लीत येणार होते. त्यावेळी मुख्यमंत्री शाह यांची भेट घेतील अशी शक्यता होती. परंतु, ही भेट झाली नसल्याचे सांगण्यात येते. महामंत्री रामपाल हे या बैठकीचा अहवाल शाह यांच्याकडे सोपवतील. त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार व इतर विषयांवर निर्णय होईल असे सांगण्यात येते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis and raosaheb danve meets party leaders for cabinet expansion and eknath khadse participation
Show comments