मुंबई : स्वयंपुनर्विकासाचे १६०० प्रस्ताव प्राप्त झाले असताना ‘म्हाडा’कडून फक्त ४२ प्रस्तावांनाच मंजुरी दिली गेली. स्वयंपुनर्विकासात कुणी खोडा घालायचा प्रयत्न केला तर त्याला नोकरी वाचविणे कठीण होईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कांदिवली पश्चिम येथील चारकोप श्वेतांबरा सहकारी गृहनिर्माण संस्थेचा स्वयंपुनर्विकास पूर्ण झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रहिवाशांना नव्या घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, स्थानिक आमदार योगेश सागर यावेळी उपस्थित होते. स्वयंपूनर्विकासाला परवानगी देताना सरकारी यंत्रणेकडून येणारे अडथळे, गैरप्रकार, खपवून घेणार नाही. या पूर्वी असे प्रकार निदर्शनास आल्यावर कठोर कारवाई केली होती, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.

स्वयंपुनर्विकासातून उभी राहिलेली ही १५ वी इमारत आहे. प्रविण दरेकर व मुंबई बँक यांच्यामुळे स्वयंपुनर्विकास मोहिमेला चालना मिळाली. त्यादृष्टीने स्वयंपुनर्विकासाचे दरेकर हे शिल्पकार आहेत. स्वयंपुनर्विकासाचा प्रवास २०१८ साली  सुरू झाला आणि आम्ही शासन निर्णय जारी केला. दुर्दैवाने २०१९ नंतर आपले सरकार नसल्यामुळे स्वयंपुनर्विकासाला खीळ बसली. आता वेगाने हे काम सुरू झाले असून गोरेगाव येथील गृहनिर्माण परिषदेत केलेल्या १८ मागण्यापैकी १६ मागण्यांचे शासन निर्णय आम्ही जारी केले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

स्वयंपुनर्विकासाबाबत असलेल्या सर्व सेवांचा समावेश राईट टू सर्व्हिसेस ऍक्टमध्ये करू, म्हाडाच्या भूखंडावरील  स्वयंपुनर्विकासाच्या बाबतीत अधिमूल्य भरण्यास यापूर्वीच तीन वर्षांची मुदत दिली होती व त्यावर साडेआठ टक्के व्याज आकारले जात होते. आता पहिल्या ३ वर्षांसाठी हे व्याज माफ करू, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

स्वयंपुनर्विकास आणि समूह पुनर्विकासात अजूनही अनेक अडचणी आहेत, याची मला कल्पना असून दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली अडचणी आणि त्यावरील उपाययोजना सुचवण्यासाठी एक समिती सरकार गठित करील. या समितीच्या शिफारशी आल्यानंतर नवीन गृहनिर्माण धोरणात समावेश केला जाईल, असेही  मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मराठी माणसांसाठी बोलणारे अनेक आहेत. पण आम्ही स्वयंपुनर्विकासातून आत्मनिर्भर मुंबईकर उभा करण्याचा संकल्प केला आहे. मुंबईचे चित्र स्वयंपुनर्विकासच बदलू शकते, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला. स्वयंपुनर्विकासासाठी जे-जे मागितले ते मुख्यमंत्र्यांनी दिले. विकासक आणि स्वयंपुनर्विकास यात फरक आहे. विकासकाकडे जाऊन आम्ही स्वाभिमान गहाण ठेवू शकत नाही. स्वयंपुनर्विकासात ‘आत्मनिर्भर’ होता येते. विकासकांचा लॉबी आपल्याला नष्ट करायची आहे, अशी घोषणा दरेकर यांनी यावेळी केली.