मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकीर्दीतील आणखी एका निर्णयाला स्थगिती दिली आहे. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या साफसफाईसाठी दिलेल्या ३१९० कोटींच्या कंटात्राला स्थगिती दिली आहे. यामध्ये कंत्राटदाराला मोठ्या प्रमाणात फायदा मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा संशय आहे.

मुख्यमंत्री फडणवीस आरोग्य विभागाचा आढावा घेणार असून या निर्णयाची चौकशी करणार आहेत. सावंत यांच्या काळात अनेक वादग्रस्त निर्णय घेण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि उपकेंद्रांच्या स्वच्छतेसाठी बाह्ययंत्रणेद्वारे यंत्रासामुग्री मागविण्याच्या कामासाठी निविदा काढण्यात आल्या होत्या. यासाठी पुण्यातील एका कंपनीला वार्षिक ६३८ कोटी रुपये देण्यात आले. विशेष म्हणजे अर्थ विभागाची मान्यता नसताना ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. सहा वर्षांसाठी ३१९० कोटींचे हे कंत्राट देण्यात आले होते. हा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे नेते विजय कुंभार तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. या माध्यमातून कंत्राटदाराला सुमारे कोट्यवधी रुपयांचा फायदा मिळवून देण्यात येणार होता. ही बाब लक्षात आल्यने आता आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या प्रत्येक निर्णयाचा आढावा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून घेण्यात येणार असून गैरव्यवहाराची चौकशी केली जाणार आहे.

तानाजी सावंत यांनी ३० ऑगस्ट २०२४ रोजी पुण्यातील एका खासगी कंपनीला ३ हजार १९० कोटी रुपयांची निविदा मंजूर केली होती. या निविदा प्रक्रियेत मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय असून यामधील पारदर्शकता तपासली जात असल्याचे स्पष्ट केले.

Story img Loader