मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक परिषदेच्या (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) वतीने आयोजित गुंतवणूक परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून रवाना झाले. त्यांचे झुरिच येथे पारंपरिक भारतीय पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले. स्वित्झर्लंडमधील भारतीय नागरिकांनी मोठ्या उत्साहाने फडणवीस यांची भेट घेतली.
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने २० ते २४ जानेवारी या कालावधीत ही परिषद आयोजित केली आहे. यापूर्वी फडणवीस हे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पहिल्या कार्यकाळात तीन वेळा दावोसमधील या परिषदेत सहभागी झाले होते. आताही दावोस दौऱ्यात गुंतवणूकदारांना आकर्षित करता येईल, यादृष्टीने भरगच्च कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. फडणवीस अनेक जागतिक नेत्यांच्याही भेटी घेणार आहेत. या दौऱ्यात उद्याोगमंत्री उदय सामंतही सहभागी झाले आहेत.
हेही वाचा : ‘एफडीए’चे संकेतस्थळ बंद; औषध विक्रेते, वितरक यांच्या परवानग्या रखडल्या
दावोस येथे आजपासून ‘महागुंतवणूक मेळा’
दावोस : स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे होत असलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या (डब्लूईएफ) वार्षिक बैठकीला सोमवारपासून सुरुवात होत असून, यंदा भारताने आपले सर्वांत मोठे शिष्टमंडळ त्यासाठी पाठविले आहे. ही बैठक पाच दिवस चालेल. बैठकीला १३० देशांतील ३ हजारांहून अधिक नेते उपस्थित असतील. भारताच्या शिष्टमंडळात पाच केंद्रीय मंत्री, तीन मुख्यमंत्री, विविध राज्यांतील मंत्री, सुमारे १०० विविध कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ), सरकारी, बिगरसरकारी, कला, संस्कृती अशा विविध क्षेत्रांतील व्यक्तीदेखील ‘डब्लूईएफ’च्या बैठकीसाठी रवाना झाल्या आहेत.
विविध सामंजस्य करार
डेटा सेंटर्स, ऑटोमोबाइल्स, सेमिकंडक्टर, ईव्ही, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील, अन्नप्रक्रिया, वस्त्रोद्याोग, औषधी आणि पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रात मोठ्या संख्येने सामंजस्य करार या दौऱ्यात होणार आहेत. राज्याची अर्थव्यवस्था एक लाख कोटी डॉलरची करण्याचे लक्ष्य आहे.