आरेतील मेट्रो कारशेडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १८ हजार कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केला. एमएमआरसीने कारशेडसाठी ३० हेक्टर जागा लागते असे सांगितले. जगभरात मेट्रो कारशेडसाठी १२ हेक्टर जागा लागते. आरेत कारशेडसाठी १८ हेक्टर जागा लागणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उर्वरित १२ हेक्टर जागा विकासकाला द्यायची आहे असा दावाही निरुपम यांनी केला.
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मेट्रो कारशेडवरुन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच निशाणा साधला. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) कारशेडचे महत्त्व, जागा याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. या जाहिरातींमधील प्रत्येक दावा निरुपम यांनी फेटाळून लावला. आरे कॉलनीत ज्या जागेवर कारशेड होणार आहे ती जागा वनक्षेत्रात मोडत नसून ती जागा दुग्धविकास मंडळाच्या मालकीची असल्याचे एमएमआरसीने म्हटले आहे. निरुपम यांनी हा दावा फेटाळून लावला. कारशेडची जागा ही वनविभाग आणि महसूल खात्याची असून या जागेचा फक्त ताबा दुग्धविकास मंडळाकडे असल्याचे निरुपम यांनी म्हटले आहे. कारशेडसाठी विविध जागांची पाहणी केली होती, मात्र आरेची जागा अनुकूल असल्याने त्याची निवड करण्यात आली असे एमएमआरसीचे म्हणणे आहे. पण हा दावाही खोटा असून एमएमआरसीने कारशेडसाठी अन्य जागांची पाहणी केल्याची नोंद नाही. माहिती अधिकारातून तशी कोणतीही माहिती उपलब्ध झाली नाही असे निरुपम यांनी सांगितले. सरकार कारशेडसंदर्भात खोटी माहिती जनतेला देत असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय निरुपम यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केल्याने आता यावर भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपांवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. आरे कॉलनीतील मेट्रो कारशेडला शिवसेना, मनसे या राजकीय पक्षांसह पर्यावरण प्रेमींनीही विरोध दर्शवला आहे.