मुंबई : शेती, उद्याोग, पायाभूत सुविधांबरोबरच रोजगार आणि सामाजिक विकास अशी पंचसूत्रीवर आधारलेला राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताबरोबरच, विकसित महाराष्ट्राचा संकल्प साकार करणारा आणि लोकाभिमुख असा हा अर्थसंकल्प असून येत्या काळात संतुलित अशा या अर्थसंकल्पाला अनुसरून आमची पुढील वाटचाल असेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी येथे दिली.
हा अर्थसंकल्प संतुलित स्वरूपाचा आणि समाजाताली सर्व घटकांना न्याय देणारा आहे. गेल्या वषर्भरात विविध योजनांवर झालेल्या खर्चामुळे राजकोषीय तूट वाढून राज्याची आर्थिक घडी कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात होती. सरत्या वर्षात ही तूट २.९ टक्क्यांपर्यंत होती. यावेळी ती २.७ टक्क्यांपर्यंत राखण्यात यश आले आहे. महसुली जमा आणि खर्च यांचा उत्तम ताळमेळ राखला गेला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पाचे आकारमान आता सात लाख कोटींवर पोहचले आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे आता लोकसंख्येच्या तुलनेत उत्तर प्रदेशचा अपवाद केल्यास, सर्वात मोठा अर्थसंकल्प असणारे राज्य ठरले आहे. राज्याचे उत्पन्न वाढल्याने कर्ज घेण्याची मर्यादाही वाढली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
अजित पवारांचा एकनाथ शिंदेंना टोला
मुंबई : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पत्रकार परिषदेदरम्यान एकनाथ शिंदे यांच्या मनात असलेली ‘मुख्यमंत्रीपदा’ची सल पुन्हा बाहेर आली. यावेळी बोलताना ‘गेल्यावेळीही आम्ही तिघे होतो. आता खुर्च्यांची थोडी अदलाबदल झाली आहे’ असे म्हणत त्यांनी याचा प्रत्यय दिला. ही बाब अजित पवारांनी अचूक हेरली आणि ‘तुमच्या मनातून ‘ते’ काही जात नाही’ असा चिमटा एकनाथ शिंदेंना काढताच एकच हशा पिकला. त्यावर शिंदेंनी तात्काळ आपले वाक्य सावरत ‘अदलाबदल झाली असली तरी टीम तीच आहे’, असे म्हटले.
गुंतवणुकीला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प : अजित पवार
पुढील पाच वर्षांत राज्याचा विकास डोळ्यासमोर ठेवून भांडवली गुंतवणुकीला प्राधान्य देणारा आणि रोजगार निर्मितीवर भर देणारा हा अर्थसंकल्प असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तसेच अर्थसंकल्पात शेतकऱ्यांचे उत्पन्नवाढीस प्राधान्य देताना कोणावरही कराचा बोजा पडणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले.
राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प शिंदे
गेल्या अडीच वर्षांपासून विकासाची घोडदौड सुरू असून महाराष्ट्र आता थांबणार नाही हा निर्धार आजच्या अर्थसंकल्पातून व्यक्त होत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. अर्थसंकल्पात रस्ते, पूल, बंदरे अशा पायाभूत सुविधांच्या विकासासाठी चांगली तरतूद केल्याचे सांगून शिंदे म्हणाले की, आजच्या अर्थसंकल्पात एकही क्षेत्र सोडलेले नाही. औद्याोगिक विकासात महाराष्ट्र आघाडीवर असून तो आणखीही पुढे राहील त्याचप्रमाणे गुंतवणुकही मोठ्या प्रमाणावर येईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.