किती दिवस मुख्यमंत्री राहेन याची मला पर्वा नाही, पण जितके दिवस मुख्यमंत्री असेन तेवढे दिवस परिवर्तनासाठी झटत राहणार अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशी भूमिकाही त्यांनी मांडली आहे.
नवी मुंबईत कै. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते. अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत विविध उपक्रम राबवण्यासाठी २०० कोटी रुपये दिले जातील अशी घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. गेले काही दिवस मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मोर्चामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अडचणीत आल्याची चर्चा आहे. त्यांचे मुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात. या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदावर किती दिवस याची पर्वा नाही असे विधान करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.
मराठा समाजाचा मोठा भाग आज पाठीमागे राहिला, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे ते म्हणालेत. राज्यात मोठ्याप्रमाणात मोठे मोर्चे निघत आहेत. या मोर्चाचे स्वरुप मूक असले तरी त्याला आवाज मोठा आहे. या मोर्चाची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे असे मुख्यमंत्री नमूद केले.
मराठा मोर्चाच्या आयोजकांनी भिजत घोंगडं ठेवू नये असे आवाहन करत सरकार मराठासोबत आहे, त्यासाठी निर्णायक निर्णय घेण्याची सरकारची तयारी आहे, या निर्णयासाठी आम्हाला चर्चा करायची आहे असे त्यांनी सांगितले. कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. यासाठी हे प्रकरण उज्वल निकम यांच्याकडे दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
किती दिवस मुख्यमंत्री असेन याची पर्वा नाही – फडणवीस
जितके दिवस मुख्यमंत्री असेन तेवढे दिवस परिवर्तनासाठी झटत राहिन अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी दिली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 25-09-2016 at 12:37 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis on maratha reservation