छोट्या राज्यांच्या निर्मितीला भाजपचा कायमच पाठिंबा राहिला आहे. सत्तेत आल्यानंतर पहिल्या दिवशीच आम्ही ही भूमिका स्पष्ट केली होती. आम्हाला ताकाला जाऊन भांडे लपविण्याची सवय नाही, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरील विरोधकांच्या आक्षेपांना ठामपणे प्रत्युत्तर दिले. गेल्या दोन दिवसांपासून विधिमंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्र्यांनी आज यासंदर्भात विधानसभेत स्पष्टीकरण दिले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले. मी अखंड महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री आहे. आम्ही तुमच्या मेहरबानीमुळे निवडून आलो नाही तर जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. त्यामुळे आमच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्याचा हक्क जनतेलाच आहे, असे त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले. एखाद्या स्वतंत्र राज्याची निर्मिती हा केंद्राच्या अखत्यारितील विषय आहे. राज्य सरकारसमोर तुर्तास तरी असा कोणताही प्रस्ताव सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे या विषयावर सभागृहात चर्चा होणे नियमाला धरून नाही. तेव्हा या चर्चेला पूर्णविराम द्यावा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विधिमंडळात स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ावरून केवळ काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानेच नव्हे तर सत्तेत सहभागी झालेल्या शिवसेनेनेही भाजपची कोंडी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अखंड महाराष्ट्राचा ठराव मांडवा, अशी विरोधकांची मागणी असून शिवसेनाही या मुद्दय़ावर विरोधात असल्यामुळे हे सरकार अल्पमतात गेल्यामुळे सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नसल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. मात्र, भ्रष्ट मंत्र्यांचे घोटाळे झाकण्यासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा लोकसभेत भाजपच्या खासदाराच्या माध्यमातून मांडण्यात आल्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे उघडकीस आल्यानंतर या भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्याचे काम मुख्यमंत्री करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी चौकशी समिती नियुक्त करण्याची गरज असून सरकारच्या होणाऱ्या बदनामीपासून दुसरीकडे लक्ष वळविण्यासाठीच स्वतंत्र विदर्भाचा मुद्दा काढण्यात आल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
‘छोट्या राज्यांना पाठिंबा; पण मी अखंड महाराष्ट्राचा मुख्यमंत्री’
आमच्या कामगिरीचे मुल्यमापन करण्याचा हक्क जनतेलाच आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 02-08-2016 at 11:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis on separate vidarbha issue in vidhan sabha