मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या टँकर मालकांच्या संपाबाबत सुवर्णमध्य साधून तातडीने तोडगा काढावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले. उन्हाळ्याचा काळ पाहता टॅंकरचालकांचा संप सुरू राहणे योग्य नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. दरम्यान, शुक्रवारी केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील यांच्या उपस्थितीत टॅंकर चालक संघटना आणि मुंबई महापालिका अधिकारी यांच्यात बैठकही पार पडली. मात्र टँकर मालकांचे समाधान न झाल्यामुळे संप अद्याप सुरूच आहे.

मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे दोनच दिवसात मुंबईतील अनेक सोसायट्या आणि विकासकामे यांना पाणी टंचाईचा फटका बसला. या प्रश्नी तिसऱ्या दिवशी तरी तोडगा निघतो का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

त्यातच शुक्रवारी दुपारी बीकेसी येथे केंद्रीय मंत्री सी. आर. पाटील हे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर बीकेसीमध्ये टँकरच्या संपाबाबत तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीला भाजपचे आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त शरद उघडे, तसेच टँकर मालकांच्या संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत टॅंकर मालकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी घेण्यासाठी मुंबईत कार्यालय नसल्याची बाब केंद्रीय मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याची माहिती दरेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे विहीर मालकांना ही परवानगी ॲपद्वारे देता येईल का यावरही चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच एखाद्याने परवानगीसाठी अर्ज केला असेल, तर त्याआधारेही त्यांना तात्पुरता पाणी उपसा करता येईल, असेही या बैठकीत ठरल्याचे दरेकर यांनी सांगितले.

टँकर मालकांच्या संघटनेने या प्रकरणी तोडगा काढावा, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पत्र पाठवून केली होती. तसेच उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनाही टँकर मालकांनी विनंती केली होती. त्यानंतर शेलार यांनी जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री सी. आर. पाटील यांना पत्र पाठवून या प्रश्नी हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. त्यानुसार शुक्रवारी केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली.

लेखी आश्वासनाशिवाय संप मागे घेणार नाही…

याबाबत मुंबई वॉटर टँकरअसोसिएशनचे पदाधिकारी अमोल मांढरे यांना विचारले असता ते म्हणाले की, बैठक पार पडलेली असली तरी यात कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत संप सुरूच राहील असाही इशारा त्यांनी दिला. २०२० मध्ये पहिल्यांदा ही नियमावली आली, तेव्हाही मौखिक आश्वासनावरच संप मागे घेण्यात आला होता. मात्र काही दिवसाच्या अंतराने महापालिका पुन्हा नोटीसा बजावते, असाही आरोप मांढरे यांनी केला.