मुंबई : ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या षडयंत्रामागे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचा हात असून पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि प्रभाकर देशमुख आरोपींच्या संपर्कात होते, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केला. या प्रकरणाच्या चौकशीतून सत्य समोर येईल असेही त्यांनी सांगितले. याला उत्तर देताना गोरेंवर झालेल्या आरोपांचीही निष्पक्ष चौकशी करणार का, असा सवाल रोहित पवार यांनी केला.

कायदा आणि सुव्यवस्थेवर विरोधकांनी उपस्थित केलेली चर्चा तसेच सत्ताधाऱ्यांच्या प्रस्तावावर एकत्रित उत्तर देताना फडणवीस यांनी सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले. गोरे बदनामी प्रकरणात तक्रारदार महिलेस तीन लोकांना अटक करण्यात आली असून त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सतत संपर्क होता. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा या प्रकरणात सहभाग आढळला. गोरे यांच्या बदनामीचे व्हीडिओ तयार करण्यात आल्यानंतर या नेत्यांना पाठविले जायचे.

आरोपी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या सतत संपर्कात होते, असा दावाही फडणवीस यांनी केला. दरम्यान, फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवार यांनी विधानसभेत आपली बाजू मांडली. गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेची बाजू विधानसभेत मांडली होती, असे पवार म्हणाले. करोना काळात गोरे यांनी सरकारी पैशांचा अपहार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप आहेत. त्याची चौकशी फडणवीस करणार का, असा सवालही रोहित पवार यांनी केला.

‘गुन्हेगारीत राज्य आठव्या क्रमांकावर’

शहरांमध्ये होणाऱ्या गुन्हेगारीत देशात पहिल्या दहा क्रमांकात राज्यातील एकही शहर नाही. देशाच्या तुलनेत शहरी भागातील गुन्हेगारी राज्यात कमी आहे. सरकारने ‘झीरो टोलरन्स’ नीतीचा अवलंब केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर गुन्हे उघड होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणा राज्यातून अटक करण्यात आली आहे. अक्षय शिंदे चकमक प्रकरणात गुन्हेगाराबिषयी संवेदना तयार होणे, योग्य नाही. यासाठी मने तपासण्याची गरज असल्याचेही मुख्यमंत्री यांनी सांगितले. राज्यात अमलीपदार्थांवर नियंत्रण आणण्यासाठी शाळा, महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या अँटी नार्कोटिक्स क्लबची स्थापना करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

गोरे बदनामी प्रकरणात तक्रारदार महिलेस तीन लोकांना अटक करण्यात आली असून त्यांचा राष्ट्रवादीच्या नेत्यांशी सतत संपर्क होता. खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि निवृत्त सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचा या प्रकरणात सहभाग आढळला. देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

अन्यायाला वाचा फोडावी यासाठी एखादी महिला भेटली आणि विधानसभेत हा मुद्दा मांडला, तर गुन्हा कसा काय? महिलेचा मंत्र्याकडून छळ केला जात असल्यास त्या विरोधात आवाज उठवायचा नाही का? – रोहित पवार, आमदार, राष्ट्रवादी