मुंबई : महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक विकसित राज्य बनवण्यासाठी विविध विकासांच्या धोरणांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सांगितले. तसेच २०२८ ते २०३० पर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक लाख कोटी डॉलर होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक परिषदेच्या शुभारंभ प्रसंगी फडणवीस बोलत होते. माजी मंत्री तथा आमदार मंगल प्रभात लोढा, वर्ल्ड हिन्दू इकॉनॉमिक फोरमचे संस्थापक स्वामी विद्यानंद, अध्यक्ष राजेश शर्मा, प्रमुख वक्ते टी. व्ही. मोहनदास पै, सहसचिव शैलेश त्रिवेदी यांसह जगभरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. भविष्यात मुंबई फिनटेकची राजधानी बनेल, असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. देशाच्या नेत्रदीपक प्रगतीने सर्व जगाला थक्क करून टाकले आहे. सर्वाधिक गतीने पुढे येणारा भारत जगात तिसरी महासत्ता म्हणून पुढे येत आहे. देशातील कुशल मनुष्यबळ हेच विकासाचे महत्त्वाचे साधन आहे. महाराष्ट्राला विकसित राज्य बनवण्यासाठी सल्लागार कमिटीची स्थापना केली. या समितीद्वारे कोणकोणत्या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो याचा अभ्यास करून यावर आधारित विकासाची धोरणे आखली जात असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. देशामध्ये उपलब्ध मनुष्यबळ हे आपल्या विकासाचे बलस्थान आहे. विकसित भारत हेच भारताचे भवितव्य आहे. भारतीय संस्कृती हा विचार आहे तो जगात पुढे नेणे गरजेचे आहे. युवांना उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देणे, आरोग्य, शिक्षण, डिजिटल तंत्रज्ञान, महिला सबलीकरण यांवरती काम होणे गरजेचे असल्याचे टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.

हेही वाचा : Kirit Somaiya : दादरमधल्या हनुमान मंदिरावरुन राजकारण; किरीट सोमय्यांचं रेल्वे अधिकाऱ्यांना पत्र, “अनेक दशकं…”

फडणवीस म्हणाले…

● जागतिक पातळीवरती महाराष्ट्र विकासाला पूरक एक साखळी बनवत आहे. यामध्ये लॉजिस्टिक धोरण, सर्वाधिक गतिमान रस्त्यांचे जाळे बनवण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे.

● नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग १६ जिल्ह्यांना जोडला आहे. हा महामार्ग थेट जवाहरलाल नेहरू (जेएनपीटी) बंदराला जोडला आहे. यातून अत्यंत चांगल्या पुरवठादारांची साखळी निर्माण होत आहे.

● रस्ते, विमान वाहतूक, बंदर विकास या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावरती राज्य शासन भर देत आहे.

● २०३० पर्यंत भारताला ५ लाख कोटी डॉलरची अर्थव्यवस्था बनवणार आहोत.

हेही वाचा : शेतीमालाच्या हमीभावाने खरेदीला मुदतवाढ; जाणून घ्या, सोयाबीन, मूग, उडदाची खरेदी कधीपर्यंत

२०३० चा मुहूर्त

राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान एक लाख कोटी डॉलर्सचे करण्यासाठी आधी २०२८ चे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते. फडणवीस यांनी आता २०२८ ते २०३० पर्यंत हे उद्दिष्ट पार पडेल, असे जाहीर केले. तसेच आतापर्यंत निम्मे उद्दिष्ट गाठल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी राज्याच्या अर्थव्यवस्थेचे आकारमान हे ४० लाख कोटींपर्यंत गेले होते.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis set target one lakh crore dollar economy maharashtra css