मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ हे अंतर दोन तासांऐवजी केवळ ३० मिनिटांत पार करता यावे यासाठी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ अशी मेट्रो ८ मार्गिका बांधण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) आणि सिडको यांच्याकडून या मार्गिकेची उभारणी केली जाणार आहे. पण या मार्गिकेची उभारणी दोन्हीपैकी कोणा एकाच यंत्रणेकडून व्हावी अशी भूमिका काही महिन्यांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली होती. मात्र त्यावर कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. आता मात्र नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ही जबाबदारी एमएमआरडीएकडे देतात की सिडकोकडे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> कमकुवत ‘ला-निना’मुळे भारतात फारशी थंडी नाही ? जाणून घ्या, जागतिक हवामान संघटनांचा अंदाज

एमएमआरडीएच्या ३३७ किमीच्या मेट्रो प्रकल्पातील मेट्रो ८ ही अत्यंत महत्त्वाची मार्गिका आहे. ही मार्गिका मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळाला जोडणार आहे. मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळाचा दोन तासांचा प्रवास केवळ ३० मिनिटांत होऊ शकणार आहे. त्यामुळे ही मार्गिका पूर्ण करण्याच्यादृष्टीने सिडको आणि एमएमआरडीएने प्राथमिक कार्यवाही सुरू केली आहे. मूळ निर्णयानुसार ३५ किमीच्या या मार्गिकेची उभारणी एमएमआरडीए आणि सिडकोकडून केली जाणार आहे. नवी मुंबई परिसरातील मार्गिकेची बांधणी सिडकोकडून तर मुंबई परिसरातील मार्गिकेची बांधणी एमएमआरडीएकडून केली जाणार आहे. त्यानुसार मुंबई विमानतळ ते मानखुर्द अशा १०.१ किमीच्या मेट्रो ८ मार्गिकेतील टप्प्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा एमएमआरडीएने दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून तयार केला आहे. सिडको मानखुर्द ते नवी मुंबई विमानतळ अशा टप्प्याच्या आराखड्याची जबाबदारी अर्बन मास ट्रान्झिट कंपनीवर टाकली आहे. मात्र अद्याप या मार्गिकेच्या प्रत्यक्ष उभारणीच्यादृष्टीने कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.

हेही वाचा >>> जनावरांची अमानुष पद्धतीने होणारी वाहतूक रोखण्यासाठी काय प्रयत्न केले ? स्पष्टीकरण देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिडको आणि एमएमआरडीएकडून या मार्गिकेची उभारणी करण्याचे निश्चित झाले होते. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी हा प्रकल्प पूर्णपणे एकाच यंत्रणेकडे सोपविण्याच्यादृष्टीने राज्य सरकारने एक बैठक घेतली होती. या बैठकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही संपूर्ण मार्गिका एमएमआरडीएकडे सोपविण्यास प्राधान्य दिले. तर तत्कालीन मुख्य सचिव आणि एमएमआरडीए-सिडकोने महा मेट्रोच्या माध्यमातून प्रकल्प राबविण्याची सूचना केली होती. त्याचवेळी या मार्गिकेतील बहुतांश मार्ग नवी मुंबईत असल्याने सिडकोनेच या मार्गाची उभारणी करावी असेही मत यावेळी मांडले होते. या सर्व चर्चेनंतर मेट्रो ८ मार्गिका नेमके कोण मार्गी लावणार यावर कोणताही अंतिम निर्णय शिंदे यांना देता आला नव्हता. पण आता मात्र मुंबई महानगर प्रदेशातील सर्व प्रकल्प मार्गी लावण्यास फडणवीस यांनी प्राधान्यक्रम दिला आहे. तेव्हा आता मेट्रो ८ बाबतही निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis soon decide responsibility of metro 8 line with cidco or mmrda mumbai print news zws