मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळातील काही निर्णयांना स्थगिती वा चौकशी सुरू केल्यावर, धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडून भाजपकडून दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना शह देण्यात आला. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही मित्रपक्षांना सूचक इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मित्रपक्षांना आपल्या पंखाखाली ठेवण्याचे भाजपचे धोरण असते. आताही शिंदे व पवार या दोन्ही मित्रपक्षांच्या नेत्यांना सरकारमध्ये मुक्त वाव मिळणार नाही, असाच संदेश भाजपने दिला. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची गेले तीन महिने मागणी करण्यात येत होती. तेव्हा अजित पवारांनी मुंडे यांना पाठीशी घातले होते. चौकशीत त्यांचे नाव कुठे, असा सवाल करीत त्यांना अभय दिले होते.

मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अजित पवारांनी फेटाळली होती. याखेरीज मुंडे यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत सामील करून घेत त्यांचे महत्त्व अधोरेखित केले होते. राजीनामा देण्यासाठी मुंडे दोषी कुठे आहेत, असा सवाल राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून केला जात होता. दुसरीकडे, भाजपकडून मुंडे यांना पद्धतशीरपणे लक्ष्य करण्यात येत होते. भाजप आमदार सुरेश धस आणि समाजसेविका अंजली दमानिया सातत्याने मुंडे यांच्यावर टीका करीत होते. दमानिया यांनी मुंडे यांनी कृषिमंत्रीपदी असताना गैरव्यवहार केल्याचा आरोप केला होता. यासाठी दमानिया यांना सरकारमधूनच कागदपत्रे पुरविण्यात आल्याचा संशय राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून व्यक्त करण्यात येत होता.

धनंजय मुंडे यांच्याबाबत दिल्लीतील भाजपचे नेते फारसे अनुकूल नव्हते. यातूनच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांचा राजीनामा घेण्याची सूचना अजित पवारांना केली होती. अजित पवारांना अधिक प्रिय असलेल्या धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास भाग पाडून भाजपने अजित पवारांना सूचक इशारा दिला.

शिंदे यांचे विधान चर्चेत

शिंदे यांची गृह खात्याची मागणी भाजपने मान्य केली नाही. एस. टी. बसेसची निविदा रद्द करून पहिला धक्का दिला. याशिवाय विविध काही निर्णयांना स्थगिती अथवा चौकशी लावण्यात आली. रायगड आणि नाशिकमध्ये पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना शिंदे यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोनच दिवसांपूर्वी शिंदे समर्थक तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील तीन हजार कोटींच्या कामांना स्थगिती देण्यात आली. ‘मला हलक्यात घेऊ नका’, असे वक्तव्य एकनाथ शिंदे हे वारंवार करीत असले तरी त्यांचा रोख उद्धव ठाकरे यांच्याबरोबरच भाजपकडे असल्याचे बोलले जाते. याबरोबरच ‘माझ्या बदनामीचे कटकारस्थान करीत आहेत’, असे शिंदे यांचे विधान भाजपला उद्देशून होते का, असाही शंकेचा सूर व्यक्त करण्यात आला.

देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. माझ्या सदसद्विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला. प्रकृती ठीक नसल्याने व काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने वैद्याकीय कारणास्तवसुद्धा मी मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे.-धनंजय मुंडे, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस</p>