खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे म्हटल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. राणा दाम्पत्याच्या घोषणेंनंतर मोठ्या संख्येने शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले होते. यामध्ये ९२ वर्षाच्या चंद्रभागा शिंदे या देखील होत्या. मातोश्री बाहेर पहारा देणाऱ्या आजींच्या घरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब भेट दिली होती. त्यावरुन भाजपा नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत चंद्रभागा शिंदे यांच्या घरातील माळा अनधिकृत माळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिसला नाही का असा सवाल केला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहूमधील बंगल्यातील अनधिकृत बांधकामाबद्दल मुंबई महानगरपालिकेने नोटीस बजावत पाहणी करण्यावरुनही निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे.
“ज्या आजीच्या घरी मुख्यमंत्री गेले त्या घरात डोक्यावर अनधिकृत अर्धा माळा बनवलेला मुख्यमंत्र्यांना व बीएमसीला दिसला नाही. दुसऱ्यांची घरं तोडायला निघालात पण नियतीने पलटी मारल्यावर तुमच्या घराचं काय होणार? तुमच्या घरात तसा कोण संघर्ष करणारा शिल्लक पण राहिला नाही, पळून जाल मुंबई सोडून,” असे निलेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यातील बेकायदा बांधकामप्रकरणी मुंबई महानगरपालिकेने नोटीस दिली होती. यापूर्वी ११ मार्च रोजी पंधरा दिवसांची नोटीस दिली होती. त्याची मुदत संपण्याआधीच १६ मार्चला पुन्हा एकदा नोटीस देण्यात आली होती. पंधरा दिवसांत अनधिकृत बांधकाम न हटवल्यास पालिकेतर्फे अनधिकृत बांधकाम तोडण्यात येईल, असा इशारा या नोटिसीत देण्यात आला होता.
‘अधीश’ या बंगल्यात अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी नोटीस पाठवल्यानंतर हायकोर्टात धाव घेणाऱ्या नारायण राणेंना दिलासा होता. मुंबई पालिकेने दिलेल्या नोटीशीचा कालावधी संपत आला असल्याने या कारवाईला स्थगिती मिळावी आणि ही नोटीस रद्द करावी अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती. दरम्यान हायकोर्टाने त्यांची याचिका निकाली काढत पालिकेला आदेश दिले होते. कोर्टाने बंगल्यातील बेकायदा बांधकाम नियमित करण्यासाठी नारायण राणे यांनी केलेल्या प्रस्तावावर निर्णय घेण्याचे पालिकेला आदेश दिले होते.
दरम्यान, ‘झुकेगा नहीं साला’ म्हणत राणा दाम्पत्याला इशारा देणाऱ्या मुंबईतील ९२ वर्षीय आजीबाईंच्या भेटीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सहकुटुंब त्यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे हेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी चंद्रभागा शिंदे या आजींची परळमधील दाभोळकर वाडीत त्यांच्या राहत्या घरी जाऊन भेट घेतली होती.