दहीहंडी खेळाताना जखमी झालेल्या एका गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला घेरलं. हा विषय अधिवेशनातही उपस्थित झाला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दहीहंडीत मृत्यू झालेल्या गोविंदाला आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. या गोविंदाला मुख्यमंत्री सहायता निधीतून १० लाख रुपये निधी दिला जाईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी राज्यातील गोविंदांनाही मदत दिली जाईल, असं आश्वासन दिलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “दहीहंडीत मृत्यू होणाऱ्या आणि जखमी होणाऱ्या गोविंदांना राज्य सरकार आर्थिक मदत देईल. जखमी गोविंदांना मदत करण्याच्या संदर्भात मी महापालिका आयुक्त चहल यांना सांगितले आहे. मदत लगेच देता येत नाही, मात्र मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाईल. मृत्यू झालेल्या गोविंदाला १० लाखांची मदत दिली जाईल. राज्यातील गोविंदांनाही मदत दिली जाईल.”
“नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्यांना आपण एनडीआरएफच्या दुप्पट आर्थिक मदत केली. याशिवाय कपडे, भांडे यांचं नुकसान झाल्यानंतर जी तातडीची आकस्मित मदत देतो त्या मदतीची रक्कम ५ हजार रुपयांवरून १५ हजार रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पीक नुकसान भरपाईसाठी बँक, कृषी कार्यालय, तहसिल कार्यालय या ठिकाणी देखील नुकसानाची माहिती देता येईल आणि अर्ज स्विकारले जातील. त्याबाबत लेखी सूचना विमा कंपन्यांना देण्यात येतील,” अशीही माहिती एकनाथ शिंदेंनी दिली.
हेही वाचा : विधान परिषदेने विधेयक रोखले तरी मंजूरीत अडथळा नाही, शिंदे सरकार विधान परिषदेत अल्पमतात असल्यानेच पेच
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय आधीच्या सरकारने घेतला होता. त्याचं वाटप तातडीने करण्यात येईल. हे वाटप १५ सप्टेंबरपासून सुरू होईल,” असंही त्यांनी नमूद केलं.