विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. आज पहिल्या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं बघायला मिळालं. दरम्यान, यासंदर्भात बोलताना मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान मोदींची भेट घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
हेही वाचा- “एकनाथ शिंदेंनी सहा महिन्यात हे बारावं कारण दिलंय, तरीही ते गद्दारच!” आदित्य ठाकरेंचा टोला
काय म्हणाले मुख्यमंत्री?
“मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही सभागृहातील सर्वच सदस्यांची भावना आहे. याबाबत लवकरच राज्याचं एक शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत कार्यवाही लवकरात लवकर सुरू करावी, अशी विनंती या शिष्टमंडळाद्वारे पंतप्रधान मोदी यांना करण्यात येणार आहे”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
“यापूर्वी केंद्र सरकारबरोबर चर्चा झाली”
यासंदर्भात बोलताना, “राज्यात आज मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात येत आहे. हा दिवस केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरात उत्साहात साजरा केला जातो. यासंदर्भात आम्ही केंद्र सरकारबरोबर चर्चा केली आहे. तसेच यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी दिल्लीला पंतप्रधान मोदी यांनी भेट घेतली पाहिजे”, अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार आशिष शेलार यांनी दिली.
हेही वाचा – “भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का?”, देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले, “सगळ्यांना…”
छगन भुजबळांनी उपस्थित केला होता मुद्दा
तत्पूर्वी, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी यासंदर्भातील मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. “आज कवी कुसुमाग्रजांची जयंती आहे. त्यांची जयंती मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरी केली जाते. मात्र, याच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करत आहे. यासाठी आवश्यक असलेले सर्व निकष मराठी भाषा पूर्ण करते. मात्र, तरीही मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाही. लवकरात लवकर हा निर्णय घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे”, असे भुजबळ म्हणाले होते.