भाजपाने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर त्यांचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवार मागे घेतला. यानंतर भाजपाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. शिवसेनेसह महाविकासआघाडीच्या काही नेत्यांनी भाजपाच्या या निर्णयाचं स्वागत केलंय, तर काही नेत्यांनी भाजपाला पराभव दिसत असल्याने उमेदवार मागे घेतल्याची टीका केलीय. अशातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही हरणार होते म्हणून भाजपाने उमेदवार मागे घेतल्याचा टोला लगावला. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं. ते ते सोमवारी (१७ ऑक्टोबर) मुंबईत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “मुंबई महानगरपालिकेची निवडणूकही जवळच आली आहे, तेव्हा कोण हरतो आणि कोण जिंकतो ते कळेल.”

“शरद पवार, राज ठाकरे, प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं”

एकनाथ शिंदे म्हणाले, “अंधेरी निवडणुकीत उमेदवार ऋतुजा लटकेंनीही आवाहन केलं होतं. रमेश लटके आमचा सहकारी आमदार होता. दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीत शरद पवार, राज ठाकरे, आमचे आमदार प्रताप सरनाईक यांनी आवाहन केलं.”

“भाजपा-शिवसेना उमेदवार जिंकण्याचा विश्वास होता, पण…”

“एकंदरीत आपण महाराष्ट्रात ज्या आमदाराचा मृत्यू होतो त्याच्या घरातील सदस्य निवडणुकीला उभा राहिला तर ती निवडणूक बिनविरोध होते. तसं बघायला गेलं तर भाजपा आणि शिवसेना युतीने उमेदवार दिला होता, त्याने जोरात तयारीही केली होती. त्यांना जिंकण्याचा विश्वासही होता. परंतु, सगळ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन माझी आणि देवेंद्र फडणवीसांची चर्चा झाली. त्यांनी त्यांच्या वरिष्ठांशीही चर्चा केली,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

” महाराष्ट्राची प्रथापरंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं”

“चर्चेनंतर आपली महाराष्ट्राची प्रथापरंपरा कायम राखण्याचं काम भाजपाने केलं आहे. त्यामुळे भाजपा-शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवार मागे घेत निवडणूक बिनविरोध केली,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

हेही वाचा : शिंदे-फडणवीसांमध्ये मतभेद होत आहेत का? पत्रकाराच्या प्रश्नावर शरद पवारांची दोन वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले, “मी तर…”

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आणि राज ठाकरेंवर टीका केली आहे. मुंबई सत्र न्यायालयात संजय राऊतांना हजर करण्यात आले होते. तेव्हा, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, “भाजपाला राज ठाकरेंनी लिहलेलं पत्र हा ‘स्क्रिप्ट’चा भाग होता. शिवसेना अंधेरीची पोटनिवडणूक ४५ हजारांच्या मताधिक्याने जिंकणार होती. भाजपाने या मतदारसंघात सर्वे केला होता. पराभवाची चाहूल लागल्यामुळेच भाजपाने उमेदवारी अर्ज मागे घेतला,” असे राऊत यांनी म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’ने याबाबत वृत्त दिलं आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde answer criticism allegations of shivsena mp sanjay raut over andheri election pbs
Show comments