महाराष्ट्रात गेले १० दिवस गणेशोत्सव मोठ्या ज्ल्लोषात साजरा करण्यात आला. १० दिवस गणरायाची सेवा करून गणेशभक्तांनी गुरुवारी (२८ सप्टेंबर) लाडक्या बाप्पाला निरोप दिला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील वर्षा बंगल्यावर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. मुख्यमंत्री आणि त्यांच्या कुटुंबांनेही काल बाप्पाला निरोप दिला. विसर्जनानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. गणरायाकडे त्यांनी राज्यासाठी काय मागितलं हेही यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, गेले १० दिवस खूप आनंदात गेले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. यावेळी गणेशभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. बाप्पाला निरोप देताना नेहमीच मन भावूक होतं. यावेळीसुद्धा मन भावूक झालं. संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत लाखो भाविक सहभागी झाले होते.

यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारलं की, यंदा गणपती बाप्पांकडे काय मागितलंत? त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, बाप्पाला सगळं माहिती आहे. गणपती आले त्याच दिवशी बाप्पाकडे संपूर्ण महाराष्ट्र सुजलाम सुफलाम कर, शेतकऱ्यांवरचं संकट दूर कर असं साकडं घातलं. शेतकऱ्याला चांगले दिवस येऊ दे, राज्यात चांगला पाऊस पडू दे, चांगलं पिक येऊ दे, राज्यातल्या प्रत्येक नागरिकाच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंदाचे दिवस येवोत, असं साकडं बाप्पाचरणी घातलं.

Story img Loader