मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राज्यभरात काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून संविधान बदलणार, आरक्षण काढून घेणार असा खोटे कथानक पसरविण्यात आले. कार्यकर्त्यांच्या अतिआत्मविश्वासामुळे आम्हीही गाफील राहिलो. मात्र येणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता आता गाफील राहू नका, खोटे कथानक पसरविणाऱ्यांना जागृत राहून सडेतोड उत्तर द्या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी महायुतीच्या पदाधिकारी- कार्यकर्त्यांना दिले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘विवेक विचार मंचा’तर्फे यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित चौथ्या राज्यस्तरीय सामाजिक न्याय परिषदेत शिंदे बोलत होते. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवना, बार्टीचे महासंचालक डॉ. सुनील वारे, विवेक विचार मंचाचे अध्यक्ष प्रदीप रावत, कार्यवाहक महेश पोहनेरकर यांच्यासह राज्यातील विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

राज्यात काही स्वयंसेवी संस्था चांगले काम करीत असल्या तरी काही स्वयंसेवी संस्थांचा विकासाला विरोध आहे. विरोधक आणि या संस्थांनी राज्यभरात गावोगावी जाऊन खोटे कथानक पसरविले. परिणामी, लोकसभा निवड़णुकीत आपल्या जागा कमी झाल्या. मात्र आता गाफील राहू नका, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

हेही वाचा >>> ‘शिवशाही’तील घरे धारावी पुनर्वसनासाठी; ‘डीआरपीपीएल’कडून संक्रमण शिबीरासाठी ३३४ घरांची मागणी

मागासवर्गीयांच्या विकासासाठी प्रयत्न

स्वराज्याबरोबर सुराज्य निर्माण करणे, तसेच रयतेचे राज्य आणण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हे काम पुढे अविरत सुरू ठेवले. राज्य सरकार हाच विचार पुढे घेऊन जात असून समता, बंधुता, न्याय या तत्त्वाद्वारे मागासवर्गीय घटकांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे. सर्वांच्या हाताला काम देण्यासाठी रोजगाराची उपलब्धता व पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी गतीने प्रयत्न केले जात असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराचे वितरण

माणगाव (जि. रायगड) येथे राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संयुक्त स्मारक उभारण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज सामाजिक न्याय पुरस्काराचे शिंदे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. नितीन मोरे (मुंबई), ज्योती साठे, सत्यवान महाडिक (महाड), घनश्याम वाघमारे (पुणे), संतोष पवार (छत्रपती संभाजी नगर), महावीर धक्का (जालना), मनीष मेश्राम (नागपूर), फकिरा खडसे (वर्धा) तसेच देव देश प्रतिष्ठान मुंबई, भीम प्रतिष्ठान सोलापूर यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र वितरण करून सन्मानित करण्यात आले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm eknath shinde appeal workers of mahayuti to remain alert ahead of assembly polls zws